मुलांचा जीव धोक्यात घालून केलेल्या या प्रवासावर सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मुलांच्या सुरक्षेशी खेळ करणे हा मोठा गुन्हा असल्याचे लोक म्हणत आहेत.
दुचाकीच्या मागे एक खास लोखंडी पिंजरा लावून त्यात पाच मुलांना बसवून अत्यंत धोकादायक प्रवास केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक नियम आणि मुलांच्या सुरक्षेला पूर्णपणे हरताळ फासणाऱ्या या प्रकारामुळे मोठी चर्चा आणि संताप व्यक्त होत आहे.
या दुचाकीच्या मागच्या बाजूला एक लोखंडी पिंजरा तयार करण्यात आला असून, त्यात पाच मुलांना कोंबून बसवले आहे. याशिवाय आणखी एका मुलाला गाडीच्या पुढच्या बाजूला बसवले आहे. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातले आहे, पण पिंजऱ्यातील मुलांसाठी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही.
ही घटना कर्नाटकमधील म्हैसूर-नंजनगुड रोडवर घडली आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काल रात्री म्हैसूर-नंजनगुड रोडवर: एका टीव्हीएस एक्सएल (TVS XL) दुचाकीवर कोंबड्यांची वाहतूक करावी तसे एका व्यक्तीने पाच मुलांना बसवले आहे. रविवार असल्याने ऊटी मेन रोडवर खूप गर्दी होती. या मुलांच्या सुरक्षेची कोणाला काळजी आहे का?'
मुलांचा जीव अशा प्रकारे धोक्यात घातल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलांचा जीव धोक्यात घालणे आणि वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन करणे हा मोठा गुन्हा असल्याचे युजर्सनी निदर्शनास आणून दिले आहे. एका युजरने म्हटले की, 'कदाचित गाडी चालवणारी व्यक्ती त्या मुलांचा बापच असावा.' तर दुसऱ्या एकाने लिहिले की, भारतातील अनेक शहरांमध्ये असे नियम मोडणे आता खूप सामान्य झाले आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर गाडी मालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
