जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नवविवाहित नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. पत्नीसमोरच झालेल्या या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, त्यातील एक होते भारतीय नौदलाचे शूर अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल जे नवविवाहित होते आणि पत्नीसमोरच गोळीबारात शहीद झाले.

हा हृदयद्रावक प्रसंग संपूर्ण देशाने अनुभवला, जेव्हा शहीद विनय नरवाल यांचे पार्थिव दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांची पत्नी, जी काही दिवसांपूर्वीच नववधू म्हणून नटली होती, ती आता साश्रू नयनांनी, “जय हिंद” म्हणत, आपल्याच पतीला अखेरचा निरोप देताना दिसली. तिचा हंबरडा आणि “जय हिंद”चा जयघोष हजारो हृदयाला चिरून गेला.

प्रीतम समोरच घेतला वीरगतीचा शेवटचा श्वास

करनाल, हरियाणा येथील रहिवासी, २६ वर्षीय विनय नरवाल, हे १६ एप्रिलला विवाहबद्ध झाले होते. फक्त काही दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यातील सुंदर सुरुवात झाली होती. त्यांचे रिसेप्शन १९ एप्रिलला पार पडले होते. नवविवाहित दाम्पत्याने आपला पहिला प्रवास काश्मीरला करण्याचा निर्णय घेतला. पण या रम्य सहलीचे रूपांतर एका काळजीभऱ्या आठवणीत झाले.

पत्नीने अश्रूंनी भरलेल्या आवाजात सांगितले, “आम्ही फक्त भेळपुरी खात होतो, तेव्हा अचानक एक माणूस आला. त्याने विचारलं, 'तो मुस्लिम आहे का?' आणि लगेच गोळी झाडली. माझ्या डोळ्यासमोर माझा पती कोसळला. मला काहीच करता आलं नाही…”

एक वीर योद्धा... एक अपूर्ण स्वप्न

लेफ्टनंट नरवाल हे कोची येथे कार्यरत होते. त्यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर भारतीय नौदलाची परीक्षा उत्तीर्ण करत 'क्लास वन ऑफिसर' म्हणून सेवा सुरू केली होती. दोन वर्षांतच त्यांची शौर्यगाथा सर्वांना परिचित झाली. शेजारीण सीमा यांनी सांगितले, “फक्त तीन दिवसांपूर्वी त्याचे लग्न मोठ्या थाटात झाले. तो खूप चांगला मुलगा होता. खूप स्वप्नं होती त्याची…”

या नवविवाहित जोडप्याने हनिमूनसाठी स्वित्झर्लंडचा विचार केला होता, मात्र वेळेअभावी त्यांनी काश्मीरला जायचा निर्णय घेतला. पण कोणाला ठाऊक होतं की, ही सहल त्यांच्या आयुष्यातलं अखेरचं सुंदर क्षण बनून राहील.

संपूर्ण देशाच्या डोळ्यात अश्रू, मनात आक्रोश

नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही शहीद विनय नरवाल यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे पार्थिव आता हरियाणातील त्यांच्या मूळ गावी, करनाल येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.