सार

UP Hathras Satsang Stampede : हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली.

UP Hathras Satsang Stampede : धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सत्संगामध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते, हे लोक मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, एटा येथील असल्याची माहिती समोर येत आहे.

चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू

सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या जास्त आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.

लोक मंडपातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी

सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुघर्टनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच विलंब झाला. स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटल आणि एटा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती

हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, "जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे प्राथमिक लक्ष आहे. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत कऱण्यात येत आहे."

योगी आदित्यनाथ यांचे ट्वीट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्वीट करत संवेदना व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक्स मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या संवेदना दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसोबत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत. घटनास्थळी पोहोचण्यासाठी एडीजी, आग्रा आणि आयुक्त, अलिगढ यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवो, ही देवाच्या चरणी प्रार्थना."

जनपद हाथरस की दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद एवं हृदय विदारक है।

मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।

संबंधित अधिकारियों को राहत एवं बचाव कार्यों के युद्ध स्तर पर संचालन और घायलों के समुचित उपचार हेतु निर्देश दिए हैं। 

उत्तर प्रदेश सरकार में मा.…

— Yogi Adityanath (@myogiadityanath) July 2, 2024

आणखी वाचा :

लोक मध्यप्रदेशातील खड्ड्यांची छायाचित्रे पोस्ट करतील, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपथ मोबाईल ॲप केले लॉन्च