तब्बल १७ वर्षांच्या अज्ञातवासानंतर माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान बांगलादेशात परतले आहेत. त्यांच्या परतण्याने बांगलादेशच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत असताना, भारताची चिंताही वाढली आहे.
ढाका: माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान बांगलादेशात परतले आहेत. १७ वर्षे लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहिल्यानंतर ते परत आले आहेत.रहमान यांची भारतविरोधी भूमिका आणि BNP चे जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरपंथी गटांशी असलेले संबंध भारतासाठी चिंतेचे कारण ठरले आहेत. सध्या भारत या घडामोडीकडे अत्यंत सावधगिरीने पाहत आहे. मात्र, जमात-ए-इस्लामीचे नेते आणि वकील शहरयार कबीर यांनी तारिक रहमान यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ढाक्यात पोहोचल्यानंतर तारिक रहमान यांनी आपले विचार मांडणारे भाषण दिले, त्यानंतर ही धमकी देण्यात आली. तारिक रहमान यांनी आपल्या वडिलांचा विश्वासघात केला असून ते भारताच्या अटी मान्य करत असल्याचा दावा केला जात आहे.
तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे नेते आहेत. आगामी निवडणुकीत त्यांची उपस्थिती BNP साठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, भूतकाळात BNP आणि तारिक रहमान यांनी भारताबद्दल अनुकूल भूमिका घेतलेली नाही. सीमावाद, तिस्ता नदी पाणीवाटप करार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची कठोर भूमिका भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकते, असे मानले जात आहे.
बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीसोबत BNP च्या असलेल्या संबंधांमुळे भारताची चिंता आणखी वाढली आहे. जमात-ए-इस्लामीची ताकद वाढल्यास धार्मिक दहशतवाद वाढेल, अशी भारताला भीती आहे. बांगलादेशात अलीकडेच हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तारिक रहमान यांच्या परतण्याने अशा कट्टरपंथी संघटनांना आणखी प्रोत्साहन मिळेल की काय, अशी भीतीही भारताला वाटत आहे.
बांगलादेशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, अशी भारताची मागणी आहे. मात्र, तारिक रहमान यांच्या आगमनाने तयार होणारी नवीन राजकीय समीकरणे भारताच्या हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे बांगलादेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भारत अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.


