दीर्घकाळ उपोषणामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हेल्थबद्दलची अपडेट रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणाची घोषणा केली होती. अशातच वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबद्दलच दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाने त्यांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सकाळी 7.40 वाजता रुग्णालयात दाखल
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सोनम वांगचुक यांच्या हेल्थबद्दल अपडेट दिली आहे. डॉ. चारू यांनी म्हटले की, सोनम वांगचुक यांना सकाळी सुमारे 7.40 वाजता सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची आयुसीत तपासणी केली. त्यानंतर वांगचुक यांना मेडिसिन विभागाच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
डिहायड्रेशनची लक्षणे, पण प्रकृती स्थिर
रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की, दीर्घकाळ उपोषणामुळे वांगचुक यांच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवत आहे. रक्त तपासणीत डिहायड्रेशनची काही लक्षणे आढळली आहेत. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन सुधारण्यासाठी उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याच्या स्थितीकडे अधिक लक्ष दिले जाईल.
'सोनम वांगचुक पूर्णपणे शुद्धीवर'
सफदरजंग रुग्णालयाच्या माहितीनुसार, सोनम वांगचुक पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर आणि नर्सची संपूर्ण टीम त्यांच्या उपचार आणि देखरेखीत कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत सध्या कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.
पत्नीच्या आरोपांवर रुग्णालयाचे स्पष्टीकरण
सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सोशल मीडियावर उपचाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली होती. यावरुन रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. डॉ. चारू बांबा यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल झाल्यापासून वांगचुक यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सध्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ त्यांची काळजी घेत आहेत.


