राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका गावात महिलांना स्मार्टफोन वापरण्यावर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. आपला निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला गेला, असे स्पष्टीकरण नंतर देण्यात आले. 

Smart Phone Ban: हल्ली जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबर आता स्मार्टफोन ही देखील गरज बनला आहे. याचा वापर केवळ बोलण्यापुरता मर्यादीत नसून त्याच्या मदतीने आता माहिती मिळवणे, मनोरंजन, बॅंक व्यवहार, शिक्षण, आरोग्य यांसाठी एक आवश्यक साधन बनला आहे. स्मार्टफोन एक शक्तीशाली साधन आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर आपलेच जीवन अधिक सोपे आणि उत्पादक बनू शकते.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका गावात महिलांना स्मार्टफोन वापरण्यावर घालण्यात आलेली बंदी लागू होण्यापूर्वीच मागे घेण्यात आली. गावातील ज्येष्ठांनी ही बंदी घातली होती. महिलांना स्मार्टफोन वापरण्यास मनाई करण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणांहून तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. गुरुवारी गाझीपूर गावात ज्येष्ठांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत त्यांनी एकमताने बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुलांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता, पण त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरसमज झाला, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

21 डिसेंबर रोजी गाझीपूर गावातील सुंदमाता पट्टी पंचायतीमधील चौधरी समाजाच्या बैठकीत गावातील मुली आणि सुनांना स्मार्टफोन वापरण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 26 जानेवारीपासून 15 गावांमध्ये हा नियम लागू करण्याचा निर्णय होता. त्या सामान्य कीपॅड फोन वापरू शकतात, असा निर्णय गावातील ज्येष्ठांनी घेतला होता.

शाळेतील अभ्यासासाठी मुली फोन वापरू शकतात, पण तो घराच्या आतच वापरावा लागेल. लग्न किंवा इतर कार्यक्रमांना जाताना स्मार्टफोन सोबत नेण्याची परवानगी नव्हती. मुले शाळेतून आल्यावर अभ्यास किंवा जेवण न करता फोन बघत बसतात. यावर आयाच नियंत्रण ठेवू शकतात. तसेच, महिलांची सायबर फसवणुकीतून फसवणूक होते. हे सर्व रोखण्यासाठी महिलांच्या स्मार्टफोन वापरावार बंदी घालण्यात आली होती. पण त्याचा गैरसमज झाला, असे गावातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.