शिमलामध्ये बँकेत भरण्यासाठी नेलेले 81,800 रुपये एका माकडाने पळवले आणि झाडावर चढून नोटा खाली फेकल्या. स्थानिकांनी बहुतांश रक्कम गोळा केली असली तरी 1,500 रुपये गहाळ झाले आणि काही नोटा खराब झाल्या आहेत.
बँकेत जमा करण्यासाठी नेलेले 81,800 रुपये एका माकडाने पळवल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला येथील डेप्युटी कमिशनर कार्यालयाजवळ हा प्रकार घडला, ज्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. एवढेच नाही तर, पैसे पळवलेले माकड झाडावर चढले आणि त्याने एक-एक करून नोटा खाली फेकायला सुरुवात केली.
खिशातून पळवले 81,800 रुपये!
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 नोव्हेंबरला घडली. बँकेत पैसे भरण्यासाठी 81,800 रुपये घेऊन चाललेल्या एका व्यक्तीच्या खिशातून माकडाने नोटांचे बंडल चोरले. काय घडतेय हे समजण्यापूर्वीच माकड जवळच्या एका झाडावर जाऊन बसले. त्यानंतर माकडाने हातातल्या बंडलमधून नोटा काढून त्या एक-एक करून खाली भिरकावायला सुरुवात केली आणि तिथे मोठा गोंधळ उडाला.
1,500 रुपये गहाळ
आपले पैसे गेले या चिंतेत असलेल्या त्या व्यक्तीच्या मदतीला डेप्युटी कमिशनर कार्यालयातील कर्मचारी आणि तिथले नागरिक धावून आले. झाडाखाली पडलेल्या नोटा गोळा करण्याचा सर्वच जण प्रयत्न करत होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर बहुतांश रक्कम गोळा करता आली. पण तरीही जवळपास 1,500 रुपयांचा हिशेब लागला नसल्याचे पैसे मालकाने सांगितले.
दरम्यान, माकडाने 500 रुपयांच्या काही नोटा चावून फाडल्याचेही समोर आले. शिमलामध्ये माकडांचा उपद्रव वाढल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी येत असतानाच सरकारी कार्यालयाजवळच ही घटना घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे अन्न आणि इतर वस्तू माकडे पळवतात, तर काही वेळा लोकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याच्या तक्रारीही नागरिक करत आहेत.












