Rajdeep Sardesai Cancer Story: ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रोस्टेट कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर ही दिवाळी त्यांच्यासाठी सर्वात खास का आहे, हे सांगितले. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर त्यांनी जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले.
Rajdeep Sardesai Cancer: प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांना चार महिन्यांपूर्वी प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. याची माहिती त्यांनी स्वतः एक्स (X) वरील पोस्टमध्ये दिली. त्यांनी सांगितले की, ६० वा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही आठवड्यांतच जुलैमध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे समजले, पण ऑगस्टमध्ये झालेल्या यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर त्यांनी जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकले.
राजदीप यांनी सांगितले की, एका नियमित वैद्यकीय तपासणीने त्यांचे जगच बदलून टाकले. डॉक्टरांकडून आलेल्या एका व्हॉट्सॲप मेसेजने जणू सर्व काही उलथवून टाकले. 'मला कॅन्सर कसा होऊ शकतो?' हाच प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता. त्यांना तेव्हा धीर मिळाला, जेव्हा त्यांच्या मुलाने म्हटले, 'जर कॅन्सर असेल तर प्रोस्टेटचा असणे चांगले आहे, कारण तो हळू वाढतो आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो.'
शस्त्रक्रियेनंतर मिळाली नवी उमेद
राजदीप सरदेसाई यांनी देशातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ऑगस्ट २०२५ मध्ये दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि स्कॅनमध्ये कॅन्सर पसरला नसल्याचे दिसून आले. आता ते ॲक्टिव्ह सर्व्हिलन्सवर आहेत, पण जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा अधिक कृतज्ञ आणि सकारात्मक झाला आहे.
कुटुंब आणि टीमचा पाठिंबा
राजदीप यांनी त्यांच्या उपचारादरम्यान साथ देणारी टीम डॉ. अंशुमन अग्रवाल, डॉ. जसविंदर पेंटल, डॉ. गोपाल शर्मा, त्यांचे कुटुंब आणि मित्रांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, 'घरातील प्रेम आणि पाठिंब्यामुळे मिळणाऱ्या समाधानाची जागा कोणतेही औषध घेऊ शकत नाही.' त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने दररोजच्या जेवणावर लक्ष ठेवले, मुलाने प्रत्येक वैद्यकीय टप्प्यावर मार्गदर्शन केले, मुलगी आणि जावई सुट्टी घेऊन त्यांच्याजवळ राहिले आणि मित्रांनी प्रत्येक अडचणीत साथ दिली. ते म्हणाले, 'प्रत्येक व्यक्तीचा एक असा व्हॉट्सॲप ग्रुप असायला हवा, जो जज न करता फक्त धीर देईल.'
दिवाळीनिमित्त खास आवाहन आणि संदेश
राजदीप यांनी देशातील सर्व लोकांना आरोग्यसेवेचे आवाहन करताना म्हटले, 'भारतात लाखो लोकांना कॅन्सर तपासणी आणि उपचाराची सुविधा मिळत नाही. जर आपल्याला बदल घडवायचा असेल, तर सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये गुंतवणूक, सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि उत्तम सुविधा आवश्यक आहेत.' या दिवाळीत त्यांनी सर्वांना CanSupport.org सारख्या संस्थांना देणगी देण्याचे आवाहन केले, जेणेकरून इतर कोणाची तरी दिवाळी प्रकाशमान होऊ शकेल. ते म्हणाले, ‘आयुष्य नेहमीच सोपे नसते, पण ते जगण्याची संधी मिळणे हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे.’


