सरपंचपदाच्या निवडणुकीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओमप्रकाश बिश्नोई यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांना फक्त ३३ मतं मिळाली, ज्यातील ११ मतं त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची होती. विशेष म्हणजे, या निवडणुकीत 'नोटा'लाही १० मतं मिळाली आहेत.
जोधपूर: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या एका इन्फ्लुएन्सरला ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त ३३ मतं मिळाली आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत इन्फ्लुएन्सर ओमप्रकाश बिश्नोई यांचा दारुण पराभव झाला. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ओसियां तालुक्यातील इंदोण की ढाणी-२ या ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली.
स्वतःला ज्योतिषी, इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर म्हणवून घेणाऱ्या ओमप्रकाश बिश्नोई यांचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर मिळून तब्बल २१ लाखांहून अधिक (२.१ मिलियन) फॉलोअर्स आहेत. पण १६०० मतदार असलेल्या त्यांच्या गावात त्यांना फक्त ३३ मतं मिळाली. या मोठ्या पराभवामुळे हा इन्फ्लुएन्सर चांगलाच हादरला आहे.
ओमप्रकाश बिश्नोई यांचे इन्स्टाग्रामवर १४ लाख, फेसबुकवर २.३२ लाख आणि यूट्यूबवर ५ लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर त्यांनी जोरदार प्रचार केला, पण निवडणुकीत त्यांना साधी सन्मानजनक मतंही मिळवता आली नाहीत. बिश्नोई यांच्याशिवाय आणखी दोन उमेदवार रिंगणात होते. यात एका कार व्यावसायिकाने बाजी मारली, तर दुसऱ्या क्रमांकावर एक शिक्षक राहिले.
गावातील सर्व मुलांना शिक्षण देणे, प्राण्यांचे संरक्षण करणे आणि सरकारी योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, अशी आश्वासने ओमप्रकाश बिश्नोई यांनी दिली होती. गावकऱ्यांनीच मला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि ते मला पाठिंबा देतील असे वाटले होते, असे या इन्फ्लुएन्सरने सांगितले. 'तुम्ही मोठ्या फरकाने जिंकाल, तुम्ही नक्कीच निवडणुकीत उतरा,' असे गावकरी मला म्हणाले होते. पण जेव्हा मतमोजणी झाली, तेव्हा मला फक्त ३३ मतं मिळाली. या ३३ मतांपैकी ११ मतं तर माझ्या स्वतःच्या कुटुंबातील आहेत. तर १० मतं 'नोटा'ला (NOTA) मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
तरीही या पराभवाने खचून जाण्यास हा इन्फ्लुएन्सर तयार नाही. पहिल्यांदाच निवडणूक लढवल्यामुळे मतदारांशी थेट संपर्क साधणे किती महत्त्वाचे असते, हे मला समजले, असे ते म्हणाले. मी माघार घेणार नाही आणि गावकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यापुढेही काम करत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
