पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा फोन टॅप करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींच्या परदेशी संबंधांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत आणि म्हणूनच ते माझ्यासोबत थेट चर्चेला येत नाहीत, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा फोन टॅप करत आहेत, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या परदेशी संबंधांचे अनेक पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. हे माहीत असल्यामुळेच मोदी माझ्याशी थेट चर्चेला (डिबेट) यायला घाबरतात, असे राहुल गांधी म्हणाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
"पुरावे इथेच आहेत, माझ्या या फोनमध्ये. हे पंतप्रधानांना चांगलेच माहीत आहे, कारण ते माझा फोन टॅप करत आहेत. ज्या क्षणी ते माझ्यासोबत समोरासमोर चर्चेला येतील, तेव्हा कोणाला परदेशी शक्ती नियंत्रित करत आहेत, खरा देशद्रोही कोण आहे आणि हे कधीपासून सुरू आहे, या सर्व गोष्टी जगासमोर येतील. माझ्या फोनमध्ये अशी अनेक माहिती आहे," असे राहुल गांधी म्हणाले.
आपल्या समर्थक मीडियाच्या दिवाळी कार्यक्रमातही मोदींना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागली, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. "व्यासपीठ आणि वातावरण अनुकूल असूनही त्यांना स्क्रिप्टची मदत घ्यावी लागली. तुम्हाला वाटल्यास तुम्ही माझ्यासोबतच्या चर्चेला टेलिप्रॉम्प्टर आणि तुमच्या आवडीचा जज घेऊन येऊ शकता. पण मोदींनी चर्चेला यायलाच हवं. खरा देशद्रोही कोण आहे, हे देशाला जाणून घ्यायचं आहे," असंही राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.













