Karnataka Govt Employees of Suspension for RSS Activities : मंत्री प्रियांक खर्गे यांनी RSS सारख्या संघटनांच्या राजकीय कार्यात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Karnataka Govt Employees of Suspension for RSS Activities : राज्यातील काही सरकारी कर्मचारी राजकीय कार्यात, विशेषतः RSS सारख्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याची गंभीर दखल ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी घेतली आहे. नियम मोडणाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
विधानसौध येथे माध्यमांशी बोलताना प्रियांक खर्गे म्हणाले की, राज्यात कर्नाटक नागरी सेवा नियम लागू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय कार्यात सहभागी होऊ नये, असा स्पष्ट नियम आहे. तरीही, नुकतेच काही जण RSS च्या कार्यक्रमांमध्ये भाषणे देत आहेत. आमच्या विभागातही काही जण गेले होते, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नियम मोडल्यास निलंबन निश्चित
RSS च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांबद्दल मी अहवाल मागवला आहे. तो अहवाल मिळताच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित (सस्पेंड) करेन. हा विषय मी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. माझ्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. याचवेळी, शाळा-कॉलेज आणि सरकारी परिसरांमध्ये अशा संघटनांच्या कार्यावर बंदी घालण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी कधीही एकाच संस्थेचे (RSS) नाव घेतले नाही. अशी कोणतीही संस्था असो, त्यांनी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी मालमत्तेचा गैरवापर करू नये, असे ते म्हणाले.
शेट्टर सरकारच्या आदेशाचा उल्लेख
याबद्दल पूर्वीही आदेश काढण्यात आले होते, याची आठवण खर्गे यांनी करून दिली. "२०१२ मध्येच एक आदेश आहे. जगदीश शेट्टर मुख्यमंत्री असताना, 'शाळांमध्ये अशा लोकांनी सहभागी होऊ नये' असा आदेश त्यांनी दिला होता. पूर्वी अनेक विभागांनी आदेश काढले आहेत. आज त्रुटी आहेत, म्हणूनच हे सर्व वाढले आहे. पूर्वी सरदार पटेल, इंदिरा गांधी यांनी RSS वर बंदी घातली नाही, असे काही जण म्हणतात, त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'हो, त्यावेळी बंदी मागे घेणे योग्य नव्हते, असेच आम्ही म्हणत आहोत,' असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.
गुरुपौर्णिमेच्या देणगीबद्दल इशारा
सरकारी कर्मचाऱ्यांनी देणगी गोळा करण्याबद्दल इशारा देताना खर्गे म्हणाले, 'अधिकृतपणे देणगी द्या. दोन वर्षांपूर्वी मीच हा मुद्दा उचलला होता. गुरुपौर्णिमेच्या वेळी PDO कडून ₹ २ हजारांपर्यंत रक्कम घेण्यात आली होती. तुम्ही तुमचे वैयक्तिक पैसे कोणालाही देणगी म्हणून द्या. पण, सरकारचे पैसे देऊ नका. सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी पैशांचा गैरवापर करू नये,' असा स्पष्ट इशारा मंत्र्यांनी दिला.
हिंदुत्व राजकारणावर टीका
याचवेळी, हिंदुत्वाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'हिंदुत्व कोणी आणले? सावरकरांनीच हिंदुत्व आणले ना? आधी सर्वजण हिंदूच होते. यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदुत्व आणले आहे. काही गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. माझी आई विश्वास ठेवते. पण, माझ्या विश्वासामुळे इतरांना त्रास होता कामा नये आणि संविधानाच्या आदर्शांना धक्का लागता कामा नये. आसाम, मिझोराम, गोवा या राज्यांमध्ये भाजप सत्तेत येण्यामागे पैसा किंवा इतर राजकीय कारणे आहेत,' असा त्यांनी अप्रत्यक्ष आरोप केला.


