सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये २००२ च्या गुजरात दंगलीच्या वेळी त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले आहे. गोध्रा रेल्वे दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचा सामना कसा केला याविषयी त्यांनी आपले अनुभव कथन केले.
स्टॉक मार्केट ब्रोकिंग स्टार्टअप झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबत त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असलेल्या २००२ च्या गुजरात दंगलीबद्दलही मोकळेपणाने सांगितले.
२००२ च्या फेब्रुवारी २४ रोजी मी पहिल्यांदा आमदार झालो होतो. २७ फेब्रुवारीला मी विधानसभेत प्रवेश केला. गोध्रामध्ये घटना घडली तेव्हा मला आमदार म्हणून केवळ तीन दिवसांचा अनुभव होता. रेल्वेला आग लागली आहे असा अहवाल मला पहिल्यांदा मिळाला. काही वेळातच तिथे मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती येऊ लागली. यावेळी मी विधानसभेत होतो. यामुळे मला चिंता वाटत होती, असे पंतप्रधानांनी सांगितले.
विधानसभेबाहेर आल्यावर लगेचच मी गोध्राला भेट देणार असल्याचे सांगितले. पण त्या दिवशी केवळ एकच हेलिकॉप्टर होते. माझ्या माहितीनुसार ते ओएनजीसी कंपनीचे होते. पण ते हेलिकॉप्टर सिंगल इंजिन असल्याने, व्हीआयपींनी त्यात प्रवास करणे योग्य नाही. ते देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याशी काही चर्चाही झाली. काहीही झाले तरी त्याची जबाबदारी मी घेतो, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर गोध्राला भेट देता आली. तिथले दुःखाचे दृश्य मी पाहिले. ते मृतदेह.. त्या दिवशी मी आयुष्यातील प्रत्येक दुःख अनुभवले. पण मी माझ्या भावना आणि नैसर्गिक प्रवृत्तीपासून दूर राहण्याच्या पदावर बसलो आहे हे मला माहीत होते. स्वतःला नियंत्रित करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला, असे ते म्हणाले.
२००२ च्या २७ फेब्रुवारी रोजी गोध्रामध्ये साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ डब्याला धर्मांधांनी आग लावली होती. यात अयोध्येहून येणाऱ्या हिंदू भाविकांसह ५९ जण जळून खाक झाले होते. कोणाचाही मृतदेह ओळखता येण्यासारख्या स्थितीत नव्हता. या घटनेनंतर गुजरातमध्ये इतिहासातील सर्वात मोठी दंगल उसळली होती.
निखिल कामत यांच्याशी झालेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सामान्य विद्यार्थ्यापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंतचा प्रवास सांगितला. "मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या एका भाषणात मी माझ्या प्रयत्नांमध्ये कोणतीही संधी सोडणार नाही, असे म्हटले होते. दुसरे म्हणजे, मी स्वतःसाठी काहीही करणार नाही. तिसरे म्हणजे, मी माणूस आहे, मी चुका करू शकतो, पण मी वाईट हेतूने चुका करणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनाचे मंत्र बनवले आहेत. चुका करणे स्वाभाविक आहे, कारण मी माणूस आहे, देव नाही, पण जाणूनबुजून चुका करणार नाही," असे ते म्हणाले.