कॉकपिटमध्ये जीवघेणा हल्ला होऊनही मोठ्या धैर्याने विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांना राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहनी यांनी २५ लाख रुपयांचा शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई : कॉकपिटमध्ये स्वतःवर जीवघेणा हल्ला झालेला असतानाही मोठ्या धैर्याने विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्यासाठी राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहनी यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा शौर्य पुरस्कार जाहीर केला.

खासदारांकडून पुरस्काराची घोषणा, राष्ट्रीय सन्मानाची मागणी

खासदार साहनी यांनी 'एक्स' (X) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, "एखाद्याच्या शौर्यातून संपूर्ण पिढीला प्रेरणा मिळायला हवी. आज @sunfoundationIn तर्फे २५ लाख रुपयांचा 'स्मित मच्छार शौर्य पुरस्कार' जाहीर करण्यात येत आहे."

"कॉकपिटमध्ये स्वतःवर जीवघेणा हल्ला झालेला असताना आणि गंभीर जखमी असतानाही कॅप्टन स्मित मच्छिहार यांनी दाखवलेले धैर्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या धाडसामुळेच एक मोठी दुर्घटना टळली आणि विमानातील सर्वांचे प्राण वाचले," असंही ते पुढे म्हणाले.

या धाडसी पायलटला राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचंही खासदारांनी सांगितलं. "मी माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांना पत्र लिहून कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या शौर्यातून आपल्या तरुणांना धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाप्रती असलेली बांधिलकी जपण्याची प्रेरणा मिळेल," असा विश्वास साहनी यांनी व्यक्त केला.

एखाद्याच्या शौर्यातून संपूर्ण पिढीला प्रेरणा मिळायला हवी. 🇮🇳✈️ आज @sunfoundationIn तर्फे २५ लाख रुपयांचा “स्मित मच्छार शौर्य पुरस्कार" जाहीर करण्यात येत आहे. कॉकपिटमध्ये स्वतःवर जीवघेणा हल्ला झालेला असताना आणि गंभीर जखमी असतानाही कॅप्टन स्मित मच्छिहार यांनी दाखवलेल्या असामान्य धैर्यामुळे मोठी दुर्घटना टळली... pic.twitter.com/WeiB7zTp6q — Vikramjit Singh MP (@vikramsahney) October 2, 2026

कुटुंबीयांना अभिमान, लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना

हवेत असताना कॉकपिटमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या असामान्य धैर्यामुळे एक मोठी विमान दुर्घटना टळली. त्यांच्या या कामगिरीबद्दल राजकोटमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी प्रचंड अभिमान व्यक्त केला. तसेच, ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजकोटमध्ये एएनआय (ANI) शी बोलताना पायलटचा चुलत भाऊ पुलकित मच्छिहार म्हणाला, "तो माझा चुलत भाऊ आहे. त्याने दाखवलेलं धैर्य आणि वाचवलेले प्राण पाहून आमच्या कुटुंबाला, समाजाला आणि संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटतोय. आमच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा एखादा राष्ट्रीय नेता स्वतःहून दखल घेतो, तेव्हा तो क्षण नक्कीच अभिमानास्पद असतो. त्याने केलेलं काम सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे."

स्मित मच्छार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना तो पुढे म्हणाला, "सध्या त्यांच्याशी थेट बोलण्याची परवानगी नाहीये. कुटुंबाशी फक्त एकदाच बोलणं झालं, तेव्हा ते आता बरे होत असल्याचं समजलं. ते लवकर बरे होऊन परत यावेत, यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत."

नेमका काय होता थरार?

३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात हा थरार घडला. विमान पाडण्याच्या उद्देशाने ओमानच्या को-पायलटने कॅप्टनवर चाकूने हल्ला केला होता. हा एक प्रकारचा दहशतवादी हल्लाच असल्याचं बोललं जात आहे. या झटापटीमुळे विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हायजॅकिंगचा सिग्नल जाण्यापूर्वीच अवघ्या दोन मिनिटांत विमान तब्बल १६,००० फूट खाली आलं होतं.

गंभीर जखमी होऊनही कॅप्टनस्मित मच्छार यांनी हल्लेखोराचा जोरदार प्रतिकार केला. यावेळी विमानातील क्रू मेंबर्स आणि काही प्रवाशांनी कॉकपिटमध्ये घुसून हल्लेखोराला पकडलं. त्यानंतर क्रू मेंबर्सनी पुन्हा एकदा विमानावर नियंत्रण मिळवलं. यानंतर सौदी अरेबियातील ताबुक (Tabuk) येथे विमानाचं सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यामुळे विमानातील सर्व १८० प्रवासी सुखरूप बचावले.