Operation Sindoor नंतर पाकच्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू, 43 जखमी, बघा Photos
नवी दिल्ली - ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, नियंत्रण रेषेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला, ज्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

गृह मंत्रालयाची तातडीची कारवाई
गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेलगतच्या भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले. "नागरिकांचे प्राण वाचवणे ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे शहा यांनी स्पष्ट केले आहे. ‘बकर्स’ नावाच्या तात्पुरत्या निवासस्थानी नागरिकांना हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमित शहा हे बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंह चौधरी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भारतीय सैन्याचा जोरदार प्रत्युत्तर
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कुपवाडा आणि राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणावर लष्करी हानी झाली आहे. संपूर्ण दिवसभर तोफांची जोरदार चकमक सुरू होती.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निशाण्यावर दहशतवादी तळ
२६ नागरिकांचा बळी गेलेल्या २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.

