इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले सुरू केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. 

हैदराबाद - इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असताना, इराण आणि इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने परत आणण्याची विनंती एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र आणि तेलंगणा सरकारला केली आहे.

‘एक्स’वर पोस्ट करून ओवैसी म्हणाले की, तेहरान विद्यापीठात शिकणाऱ्या १४० वैद्यकीय विद्यार्थ्यांसह १,५९५ भारतीय इराणमध्ये अडकले आहेत. तसेच इराकमध्ये १८३ भारतीय यात्रेकरू भीतीच्या सावटाखाली आहेत.

विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव आनंद प्रकाश यांच्याशी मी बोललो असून, अडकलेल्या सर्वांची माहिती दिली आहे, असे ओवैसी म्हणाले. केंद्र सरकारने यावर तातडीने कारवाई करून त्यांना परत आणावे, अशी विनंती त्यांनी केली. विदेश मंत्री जयशंकर यांना हे प्रकरण तातडीने हाताळण्यास सांगितले आहे.

तेलंगणातील विद्यार्थी आणि पर्यटकही तिथे असल्याने, त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकारनेही मदत करावी, असे ओवैसी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशीही संपर्क साधला आहे.

इराणमधील तणाव वाढत असल्याने, तिथे असलेल्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता कारवाई करावी, असे ओवैसी यांनी स्पष्ट केले.