Next five years Plan : सुखकर प्रवासाची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे, पुढील पाच वर्षांत प्रमुख शहरांमधून नवीन गाड्या सोडण्याची क्षमता दुप्पट करावी लागेल. परिणामी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे,  

Next five years Plan : सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था म्हणून आजही रेल्वेकडेच पाहिले जाते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्वाधिक सक्षम सेवा म्हणून रेल्वे ओळखली जाते. रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे, मात्र तरीही वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता देशातील अनेक ठिकाणी या सेवेवर खूप ताण येतो. या भागांमध्ये गाड्यांची संख्या अपुरी पडते. हेच ध्यानी घेऊन रेल्वे प्रशासनाने आगामी पाच वर्षांकरिता विशेष योजना तयार केली आहे. ज्यामुळे रेल्वेचे रुपडे पालटेल आणि ती आणखी सक्षम होईल.

प्रवाशांची संख्या झपाट्याने आणि सातत्याने वाढत असल्यामुळे, पुढील पाच वर्षांत प्रमुख शहरांमधून नवीन गाड्या सोडण्याची क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट करावी लागेल. आगामी वर्षांतील मागणी पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "आम्ही प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी विविध शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत, विभागीय आणि परिचालन क्षमता वाढवत आहोत. या पावलामुळे आपले रेल्वे नेटवर्क सुधारेल आणि देशभरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.''

दरम्यान, 2030 पर्यंत गाड्या सोडण्याची क्षमता दुप्पट करण्याच्या कामामध्ये सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांद्वारे क्षमता वाढवणे; शहरी भागांमध्ये आणि आसपास नवीन टर्मिनल्ससाठी जागा शोधणे आणि ते तयार करणे; मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभालीच्या सुविधा; विविध ठिकाणी वाढलेल्या ट्रेनसेवा हाताळण्यासाठी वाहतूक सुविधांची कामे, सिग्नलिंग अपग्रेडेशन आणि मल्टी-ट्रॅकिंगद्वारे विभागीय क्षमता वाढवणे यांचा समावेश असेल.

हे काम उपनगरी आणि शहराबाहेरील दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी केले जाईल, प्रत्येक विभागाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन. 48 प्रमुख शहरांसाठी एक व्यापक योजना विचाराधीन आहे. या योजनेत एका विशिष्ट मुदतीत ट्रेन चालवण्याची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजित, प्रस्तावित किंवा आधीच मंजूर केलेल्या कामांचा समावेश असेल.

2030 पर्यंत क्षमता दुप्पट करण्याची योजना असून ही क्षमता टप्प्याटप्प्याने वाढेल, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून या वाढीचे फायदे त्वरित मिळू शकतील. ही योजना कामांना तीन भागांमध्ये विभागणार आहे, तत्काळ - अल्पकालीन आणि दीर्घकालीन.

प्रस्तावित योजना विशिष्ट कालमर्यादा आणि निश्चित परिणामांसह स्पष्ट असतील. जरी हे काम विशिष्ट स्थानकांवर केंद्रित असले तरी, प्रत्येक झोनल रेल्वेला त्यांच्या विभागामध्ये ट्रेन चालवण्याची क्षमता वाढवण्याची योजनेची आखणी करण्यास सांगितले आहे, जेणेकरून केवळ टर्मिनलची क्षमताच वाढणार नाही, तर स्टेशन आणि यार्डमधील विभागीय क्षमता आणि कार्यान्वयन मर्यादांवरही प्रभावीपणे तोडगा काढला जाईल.