दांडियाचा सीझन संपल्यानंतर ई-कॉमर्स कंपन्यांना परत केलेल्या पार्सलचा एक मोठा ढीग दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. सणासुदीला घातलेले कपडे आणि दागिने वापरून लोक रिटर्न पॉलिसीचा गैरफायदा घेत आहेत का, असा सवाल आता नेटकरी विचारत आहेत.

मुंबई : सणासुदीच्या काळात छान दिसावं म्हणून लोक नवीन कपडे, दागिने आणि ॲक्सेसरीजवर भरपूर खर्च करतात. पण, सण संपल्यावर या खरेदी केलेल्या वस्तूंचं नेमकं काय होतं? यावर आता एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दांडियाचा सीझन संपताच रिटर्न केलेल्या पार्सलचा अक्षरशः ढीग साचल्याचं या व्हिडिओत दिसतंय. यामुळे अनेक युजर्सनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या रिटर्न पॉलिसीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय. एक्स (X) युजर निशांत चंट (Nishant Chant) याने हा व्हिडिओ शेअर केलाय. यात एका निवासी संकुलातून मोठ्या प्रमाणावर पार्सल गोळा केल्याचं दिसतंय. शिपिंग लेबल आणि बारकोड असलेली ही पार्सल एका शटरखाली आणि बाहेरच्या मोकळ्या जागेत विखुरलेली पाहायला मिळत आहेत.

व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की, शूटिंग करणारी व्यक्ती एक मोठी गुलाबी रंगाची पिशवी उघडते, जी पार्सलने खचाखच भरलेली असते. तसंच, रिटर्न केलेल्या पार्सलची पांढरी पोती इकडे-तिकडे हलवली जात आहेत. इमारती आणि झाडांच्या मधल्या रस्त्यांवरही सीलबंद पार्सलचे ढीग पडलेले स्पष्ट दिसत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पार्सल रिटर्न आल्याने, लोकांनी नवरात्री आणि दांडियासाठी कपडे आणि ॲक्सेसरीज मागवल्या आणि सण संपल्यावर त्या सरळ परत केल्या, असा अंदाज लावला जातोय. अर्थात, हे पार्सल नेमके कशाचे आहेत आणि ते का परत केले जात आहेत, याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ शेअर करताना निशांत चंटने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "दांडिया खतम... ड्रेस रिटर्न. शेमलेस जनरेशन (निर्लज्ज पिढी)."

Scroll to load tweet…

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

या व्हिडिओमुळे इंटरनेटवर एकच वाद पेटलाय. अनेकांनी या प्रकारावर सडकून टीका केली असून, अशा प्रकारे सर्रास वस्तू परत केल्याने विक्रेत्यांना आर्थिक आणि लॉजिस्टिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं मत व्यक्त केलंय.

एका युजरने आपला अनुभव सांगताना लिहिलंय, "मी एकाला असं म्हणताना ऐकलंय की, 'जर महाग वाटत असेल तर इव्हेंट संपल्यावर परत कर'."

दुसऱ्या एका युजरने चिंता व्यक्त केली की, अशा वागण्यामुळे भविष्यात रिटर्न पॉलिसी अधिक कडक होऊ शकते, ज्याचा फटका खऱ्या ग्राहकांना बसेल. त्याने लिहिलंय, "हळूहळू यांच्या नादात २४ तासांची रिटर्न पॉलिसी होईल.. आणि खऱ्या ग्राहकांना याचा फटका बसेल."

पण, सगळ्यांनाच हे चुकीचं वाटत नाहीये. ग्राहकांना शॉपिंग प्लॅटफॉर्म्सने दिलेल्या सुविधांचा वापर करण्याचा अधिकार आहे, असं सांगत एका युजरने याचं समर्थन केलंय. तो म्हणाला, "जेव्हा एक्सचेंज/रिफंडचा पर्याय उपलब्ध आहे, तर मग त्याचा वापर का करू नये? भलेही तुम्ही निर्लज्ज म्हणा, चालेल."