Chemist Strike : ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. राज्यातील सुमारे १.२५ लाख आणि देशातील साडेबारा लाखांहून अधिक केमिस्ट या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

Chemist Strike : देशभरात ऑनलाइन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनी मोठा एल्गार पुकारला आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज देशव्यापी बंद आयोजित करण्यात आला असून, राज्यातील तब्बल १ लाख २५ हजार तर देशभरातील साडेबारा लाखांहून अधिक औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑनलाइन अॅप्सद्वारे नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने यावर बंदी आणावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेते आक्रमक

औषध विक्रेते संघटनांच्या मते, ऑनलाइन फार्मसी कंपन्या डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकत आहेत. यामुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही, तर अनेक गंभीर आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या आणि शक्तीवर्धक औषधे सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये गैरवापर वाढत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

कोविड काळातील सवलतीचा गैरफायदा?

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने विशेष परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन औषध विक्रीला तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र, औषध विक्रेत्यांच्या मते ही तात्पुरती सवलत कायमस्वरूपी व्यवसायात रूपांतरित करण्यात आली. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य ऑनलाइन औषध विक्री सुरू असून त्याचा फटका पारंपरिक केमिस्ट दुकानांना बसत आहे.

‘डिजिटल रेकॉर्ड नसल्याने धोका वाढतो’

संघटनांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन औषध विक्रीत योग्य डिजिटल रजिस्टर किंवा पडताळणी प्रक्रिया ठेवली जात नाही. त्यामुळे डॉक्टर खरे आहेत की बनावट, याची शहानिशा होत नाही. तसेच देशभरात बनावट औषधांचे रॅकेट सक्रिय असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. ट्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्टच्या चौकटीत ऑनलाइन औषध विक्री व्यवस्थित बसत नसल्याने कायदेशीर गोंधळ निर्माण झाल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे.

सामान्य रुग्णांचे हाल होण्याची शक्यता

आज राज्यासह देशभरातील बहुतांश औषध दुकाने बंद राहणार असल्याने सर्वसामान्य आणि आपत्कालीन रुग्णांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः नियमित औषधे घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांवरील औषधांवर अवलंबून असलेले लोक अडचणीत येऊ शकतात. मात्र, संघटनांनी हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा केला आहे.

केंद्र सरकारकडे निवेदन, प्रतिसादाची प्रतीक्षा

ऑनलाइन फार्मसीवर नियंत्रण आणण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच आता देशव्यापी बंदद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

-

## Slug

****