एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक आई व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्यासाठी गुगलच्या जेमिनी AI ची मदत घेताना दिसत आहे. AI ने तिला अगदी सोप्या भाषेत स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली. या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या असून, 'मुलाची जागा आता AI ने घेतली' अशी मजेत चर्चा सुरू आहे.

मुंबई : मोहित शर्मा नावाच्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची आई व्हॉट्सॲप स्टेटस कसं ठेवायचं, यासाठी जेमिनी AI ची मदत घेताना दिसत आहे. ॲप उघडण्यापासून ते योग्य फोटो निवडण्यापर्यंत AI तिला प्रत्येक गोष्टीत मदत करतं. मोहितने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, "माझ्या आईला नेहमी असाच मुलगा हवा होता, आणि जेमिनीने ती जागा घेतली."

या व्हिडीओमध्ये मोहितची आई जेमिनीला विचारते की व्हॉट्सॲप कसं उघडायचं. त्यावर AI तिला स्क्रीनच्या खाली असलेल्या सर्च बारमध्ये जाऊन "WhatsApp" टाईप करायला सांगतं.ॲप उघडल्याचं आईने सांगितल्यावर, जेमिनी तिला 'अपडेट्स' (Updates) कुठे शोधायचं हे सांगतं. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली असलेल्या गोल आयकॉनवर क्लिक करायला AI तिला सुचवतं.

AI ने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर आई म्हणते, “अच्छा. दबा दिया.” यानंतर जेमिनी तिला सांगतं की ती आता अपडेट्स स्क्रीनवर आहे. नवीन स्टेटस कसं ठेवायचं, हे समजावताना AI तिला कॅमेरा किंवा पेन्सिल बटणावर क्लिक करायला, किंवा "Add status" वर टॅप करायला सांगतं. त्यावर आई लगेच उत्तर देते, “पेन्सिल ही कर दिया मैने.”

मग AI तिला गॅलरीतून फोटो निवडायला सांगतं. फोटो निवडल्यानंतर हिरव्या रंगाच्या बाणावर (ॲरो) क्लिक करून व्हॉट्सॲप स्टेटस अपलोड कसं करायचं, याची पूर्ण माहिती देतं. शेवटची स्टेप पूर्ण झाल्यावर आई जेमिनीला सांगते, “लगा दी.” यावर जेमिनी अगदी माणसासारखं उत्तर देतं, “बहुत बढिया.”

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

View post on Instagram
 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आई आणि AI मधील हा संवाद पाहून नेटकऱ्यांनी खूप मजेशीर आणि प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, “मी सुद्धा वृद्धांना मदत करण्यासाठी असंच काहीतरी बनवत होतो. पण गुगलने हे आधीच करून ठेवलंय, त्यामुळे आता मला व्हॉईस आणि व्हर्च्युअल सिम्युलेशन बनवण्याची गरज नाही.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, “छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. खूप सुंदर भावना आहेत आणि हे पाहायलाही खूप छान वाटतंय.” आणखी एकाने लिहिलंय, “किती समाधानकारक.”तर एका युजरने मजेत लिहिलंय, "बेटे होने की जॉब भी AI खा गया."