Meta CEO Mark Zuckerberg : काही विशिष्ट प्रकारचा कंटेंट प्रमोट करण्यासाठी पैसे घेतल्याची कबुली मेटाने दिली आहे, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र, पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल या माफीनाम्यात कोणताही उल्लेख नाही.
नवी दिल्ली : मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी भारताच्या संसदीय समितीसमोर माफी मागितली आहे. मेटाच्या प्लॅटफॉर्मवर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित कंटेंट, डीपफेक व्हिडिओ आणि प्लॅटफॉर्मच्या कामातील चुकांबद्दल त्यांनी ही माफी मागितल्याचं रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
एवढंच नाही, तर काही विशिष्ट प्रकारचा कंटेंट पसरवण्यासाठी पैसे घेतल्याचंही मेटाने मान्य केल्याचं या रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. पण, पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवल्याच्या प्रकरणावर मात्र यात कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट असलेल्या मेटाच्या जाहिरातींवरून मोठा वाद निर्माण झाला होता. याशिवाय, तांत्रिक चुकीमुळे पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल झुकरबर्ग यांनी माफी मागावी, असा इशारा संसदीय समितीने यापूर्वी दिला होता. यानंतर ५ आणि ६ ऑगस्ट रोजी मेटाचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी भारतात आले होते. त्यांची ही बैठक सुरू असतानाच, झुकरबर्ग यांनी भारताची माफी मागितल्याची बातमी समोर आली आहे.


