प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी आपल्या चित्रांमधून गोव्याच्या जीवनशैलीला जिवंत केले. भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या या कलाकाराची कला आजही कळंगुट येथील मारिओ गॅलरी आणि पणजीतील फॉन्टेनहास परिसरात अनुभवता येते.

गोवा म्हटलं की समुद्रकिनारे, निसर्ग आणि रंगतदार संस्कृती डोळ्यासमोर येते. पण या सगळ्यांसोबत गोव्याची आणखी एक खास ओळख म्हणजे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि चित्रकार मारिओ मिरांडा. त्यांच्या चित्रांनी गोव्याच्या जीवनशैलीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मारिओ मिरांडा यांचा जन्म 2 मे 1926 रोजी झाला होता. त्यांनी दैनंदिन जीवनातील साध्या माणसांना, बाजारपेठा, कॅफे, चर्च, संगीत आणि गोव्याच्या गावाकडील वातावरणाला विनोदी शैलीत चित्रांमध्ये जिवंत केले. त्यामुळे त्यांची कला आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोणते मिळाले पुरस्कार? 

त्यांच्या कामाची दखल देश-विदेशात घेतली गेली. भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांच्या चित्रांनी भारतीय व्यंगचित्रकलेला नवी दिशा दिली, असे मानले जाते. गोव्यात आजही त्यांच्या कलेचा अनुभव घेण्यासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कळंगुट येथील मारिओ गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांच्या प्रतिकृती, पुस्तके आणि स्मरणिका पाहायला मिळतात. येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

कला प्रेमींसाठी हा आहे अनोखा अनुभव 

पणजीतील फॉन्टेनहास परिसरातही त्यांच्या शैलीने प्रेरित भित्तीचित्रे आणि कलाकृती दिसतात. या भागात फिरताना गोव्याच्या जुन्या संस्कृतीसोबत मारिओ यांच्या कलेची झलक अनुभवायला मिळते. त्यामुळे हा भाग पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो. मारिओ मिरांडा आता आपल्यात नसले तरी त्यांच्या रेषा, रंग आणि विनोदी दृष्टीकोनातून गोवा आजही जिवंत दिसतो. म्हणूनच गोव्याला भेट देणाऱ्या प्रत्येक कला प्रेमीसाठी त्यांची कला पाहणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरतो.