Man Claims Wife Turns Into Snake : उत्तर प्रदेशमध्ये एका पतीने पोलिसांत तक्रार केली की, त्याची पत्नी रात्री सापात बदलते. पण, पोलिसांच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं. काय आहे ही कहाणी?

Man Claims Wife Turns Into Snake : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एक विचित्र प्रकरण चर्चेत आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी सापात रूपांतर होऊन ती त्याला झोपू देत नाही, अशी तक्रार त्याने पोलिसांत दाखल केली. 'माझी पत्नी रात्रीच्या वेळी सापात बदलते. मला घाबरवते, झोपू देत नाही. यावर कारवाई करा, माझ्या पत्नीपासून मला वाचवा,' अशी तक्रार त्याने केली आहे.

मीडियासमोरही तक्रार

सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद तहसीलच्या लोधासा गावातील मेराज नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दिली होती, जी ऐकून पोलीस चक्रावले. सुरुवातीला त्यांना हसू आले, पण पतीने मीडियासमोरही हाच दावा केला. हे ऐकून पोलिसांनी तपास सुरू केला. 'माझी पत्नी नसिमुन मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ती रात्री "सापा"सारखी फुत्कारते, नागासारखी वागते. मला घाबरवते. झोपू देत नाही,' असे त्याने सांगितले.

पत्नीने सांगितली वेगळीच कहाणी

पोलिसांनी पत्नीची चौकशी केली असता, तिने सांगितले की तिचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करत आहे. दोघांच्या तक्रारी ऐकून पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा वेगळेच सत्य समोर आले!

तपासात सत्य उघड

सत्य हे आहे की, काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. पत्नीला घाबरवण्यासाठी मेराज दुसरे लग्न करण्याची धमकी देत होता. पैशांसाठी त्रास देत होता. ती कुठे तक्रार करेल या भीतीने त्याने आधीच पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून त्याने ही सापाची खोटी कहाणी रचल्याचे उघड झाले.

आता पोलिसांनी मेराजविरोधातच गुन्हा दाखल केला असून, त्याची चौकशी करत आहेत. खोटी कहाणी रचून पोलीस आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवल्याबद्दल मेराजवर खटला दाखल केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.