सार
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी यासोबतच कोकणात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाण्यात पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून हवेत गारवा ही निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. कळवा, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर या भागात परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बुधवारी ही येथे पावसाची रिमझिस सुरु होती. आज वातावरणात बदल झाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकल भागात पाणी सासण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाची धुवाधार बँटिंग
ठाण्यात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहापूर तालुक्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहापूर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी 9 वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि आता मात्र पावसाचा जोर वाढला असून तालुक्यामध्ये सर्वत्रच मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून भातशेतीच्या कामांनी वेग धरला आहे.
मुंबईसह पालघरमध्ये पावसाची हजेरी
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये पालघर, डहाणू परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात 286 मिलिमीटर नोंदला गेला असून पालघर जिल्ह्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत 211.7 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलं आहे. मुंबईतही आज पहाटे पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
रायगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस
रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली, वडवली, वेळास, अदगाव दिघी, दिवेआगर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्याला वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चिपळूण, दापोली, खेडसह गुहागरमध्ये मुसळधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित झाला आहे.