मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील डेलवाडी गावात खेळत असताना एका तीन वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या नाक, ओठ आणि पापण्यांना खोल जखमा झाल्या आहेत. सध्या चिमुरडीवर इंदूरमधील शासकीय रुग्णालयात विशेष उपचार सुरू आहेत.

घरासमोर खेळताना अचानक हल्ला
सदर घटना शनिवारी उज्जैन जिल्ह्यातील डेलवाडी गावात घडल्याचे सांगण्यात आले आहे. मुलगी घरासमोर खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेत मुलीची सुटका केली आणि तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला अगर-मालवा जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला पुढील उपचारांसाठी इंदूर येथे हलविण्यात आले.
चेहऱ्यावर ५० टाके, प्लास्टिक सर्जरीची गरज
इंदूर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या चेहऱ्यावर सुमारे ५० टाके घालावे लागले आहेत. विशेषतः डोळ्यांची खालील पापणी, नाक आणि ओठांच्या भागाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. रक्तस्त्राव थांबविणे आणि त्वचेचे नुकसान भरून काढण्यासाठी प्राथमिक शस्त्रक्रिया करण्यात आली. भविष्यात चेहऱ्यावर कायमस्वरूपी विकृती येऊ नये यासाठी प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता भासू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याने चिंता
या घटनेनंतर राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच बडवानी येथे ३५ वर्षीय महिलेचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सार्वजनिक ठिकाणी, शाळांच्या परिसरात तसेच निवासी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचीही गंभीर दखल
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कुत्र्यांबाबत नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. लसीकरणानंतर अशा कुत्र्यांना निश्चित निवारा केंद्रांमध्ये हलविण्याबाबतही न्यायालयाने सूचना केल्या आहेत. तसेच रेबीजग्रस्त किंवा अत्यंत धोकादायक कुत्र्यांबाबत विशेष उपाययोजनांना परवानगी देण्यात आली आहे.


