भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नवनीत राणा, ओवैसींवर केला हल्लाबोल

| Published : May 09 2024, 02:18 PM IST / Updated: May 09 2024, 03:06 PM IST

navneet rana news owaisi

सार

खासदार नवनीत राणा यांचा तेलंगणाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला. चंपापेट हैदराबाद येथे त्यांनी युवा मेळावा घेऊन मेहबूब नगर येथे रोड शो केला. यावेळी त्यांनी आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला देत जोरदार टिका केली.

हैदराबाद Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला देत ओवैसींवर जोरदार टिका केली. हैदराबाद हा एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे तेलंगणासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपाने नवनीत राणा यांचा समावेश केला आहे. त्यांनी चंपापेट हैदराबाद येथे भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी युवा मेळाव्याला संबोधित केले. त्याचबरोबर त्यांनी मेहबूब नगर येथे भाजपचे उमेदवार श्रीमती डी.के. अरुणा यांच्या प्रचारासाठी रोड शो काढण्यात आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जागोजागी ढोल ताश्या व फाटक्याच्या आतिषबाजीमध्ये पुष्पगुछ देऊन स्वागत व अभिनंदन केले.

नवनीत राणा या आक्रमक बोलण्यासाठी ओळखल्या जातात. याच नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी नाव न घेता ओवैसी बंधुंवर प्रहार केला.

नवनीत राणा यांनी प्रचारसभेत एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वादग्रस्त विधानाचा दाखला दिला. “छोटा म्हणतो पोलिसांना 15 मिनिटासाठी हटवा मग आम्ही दाखवतो काय करु शकतो ते, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा अकबरुद्दीन ओवैसी आणि मोठा असदुद्दीन ओवैसी यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं नवनीत राणा म्हणाल्या. 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने हे प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. अकबरुद्दीन म्हणाले होते की, 15 मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे. या प्रकरणात कोर्टाने त्यांची सुटका केली असली तरी आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खासदार नवनीत राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा खासदार नवणीत राणा आणि ओवैसी यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे.