Sridhar Vembu: झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी शिक्षित उच्चभ्रूवर्गाला आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि प्रादेशिक भाषांशी जोडले राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, खरी देशभक्ती हीच असून, शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात ती अधिक जिवंत आहे. 

झोहोचे संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक श्रीधर वेंबू यांनी भारतातील शिक्षित उच्चभ्रूवर्गाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. “खऱ्या देशभक्तीचा अर्थ म्हणजे आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी घट्ट बांधून राहणे.” त्यांनी नागरिकांना प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीत रुजू होण्याचे आवाहन केले आहे, कारण त्यांना विश्वास आहे की ही खरी देशभक्तीची ओळख आहे.

'उच्चभ्रू वर्गात राष्ट्रभावना कमी झाली'

वेंबू यांच्या मते, भारताचा प्रगतीचा आधार फक्त आर्थिक विकासावर नव्हे तर देशभक्तीच्या जाणीवावरही आहे. “आपल्या शिक्षित अभिजातवर्गात देशाचा भाग असल्याचा अभिमान असणे आवश्यक आहे. देशभक्तीशिवाय विकासाला खरंतर काहीच किंमत नाही,” असं ते म्हणतात. आधुनिक जागतिकीकरणामुळे अनेक शहरी लोक स्वतःला ‘जागतिक नागरिक’ समजून आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहेत, असा त्यांचा गंभीर इशारा आहे.

वेंबू म्हणाले, “तमिळनाडूमध्ये मी शक्य तितक्या वेळा तमिळमध्येच संवाद साधतो. तुम्ही जर बंगळूरूला जाणार असाल, तर कन्नड शिकणे गरजेचे आहे; मुंबईत असाल तर मराठी अवगत करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रत्येक भाषेची आणि संस्कृतीची कदर करायला हवी.”

'गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये देशभक्तीची भावना अजूनही जिवंत'

शहरी आणि ग्रामीण भारतातील देशभक्तीतील फरकांवर लक्ष देत त्यांनी सांगितले, “गावांमध्ये आणि छोटे शहरांमध्ये देशभक्तीची भावना अजूनही जिवंत आहे. पण शहरी शिक्षित वर्गात ती कमी होत आहे. ‘मी जागतिक नागरिक आहे, कुठेही राहीन’ या विचारसरणीला बदलणे गरजेचे आहे.”

वेंबू यांनी झोहो कंपनीचा यशस्वी विकास देशभक्तीशी जोडत सांगितले, “झोहो अस्तित्वात आहे कारण आमच्या कर्मचाऱ्यांच्या मनात देशासाठी काम करण्याची प्रामाणिक भावना आहे. हीच भावना झोहोला टिकवून ठेवते.”

जपान, कोरिया आणि चीन यांसारख्या देशांना आदर्श म्हणून मांडताना वेंबू म्हणाले, “त्यांच्या लोकांमध्ये देशभक्तीची भावना होती, म्हणूनच ते इतक्या वेगाने विकसित झाले. जर ती भावना नसेल तर वाढ, बुद्धिमत्ता पलायन यांचे प्रश्न निरर्थक ठरतात.” तुम्हालाही खऱ्या देशभक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर स्थानिक भाषा आणि संस्कृतीत रुजू व्हा! आणि हो, कर्नाटकात कन्नड, महाराष्ट्रात मराठी शिकायला कधीच मागे हटू नका!