पलक्कड येथील आमदार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल ममकुट्टाथिल यांच्यावर काही महिलांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी हॉटेलमध्ये बोलवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केरळमध्ये जोरदार राजकीय वादळ उठले आहे.
तिरुअनंतपुरम (केरळ)- लेखिका हनी भास्करन यांनी काँग्रेसचे पलक्कड येथील आमदार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल ममकुट्टाथिल यांच्यावर आरोप केले आहेत. फेसबुक पोस्टमध्ये हनी भास्करन यांनी म्हटलं की, राहुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मेसेज पाठवले.
त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तो प्रवासासंबंधी होता आणि त्यांनी उत्तर दिलं, पण नंतर राहुल यांचे सतत मेसेज येऊ लागले. जेव्हा त्यांना जाणवलं की तो थांबण्याच्या मनःस्थितीत नाही, तेव्हा त्यांनी उत्तर देणं बंद केलं. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून समजलं की, राहुल यांनी त्यांच्याबद्दल वाईट बोललं आणि संभाषणाची सुरुवात त्यांनीच केली असा खोटा दावा केला.
हे आरोप अभिनेत्री आणि मॉडेल रिनी अॅन जॉर्ज यांनी राहुल यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर लगेचच समोर आले. रिनी यांनी सांगितलं की, आमदारांनी त्यांना वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि हॉटेलमध्ये येण्यासाठी बोलावलं. जेव्हा त्यांनी पक्षाला सांगण्याची धमकी दिली, तेव्हा राहुल यांनी आव्हान दिलं की, सांगून दाखव. मात्र रिनी यांनी त्या वेळी नाव किंवा पक्षाचं नाव उघड केलं नव्हतं.
रिनी यांनी दावा केला की, त्यांनी ही बाब पक्ष नेतृत्वाला सांगितली होती. त्याचबरोबर काही नेत्यांच्या पत्नी आणि मुलींनाही अशाच अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे, असं त्यांनी म्हटलं.
त्या म्हणाल्या, "ज्या नेत्यांना स्वतःच्या कुटुंबातील महिलांचं संरक्षण करता येत नाही, ते इतर कोणत्या महिलांचं करणार?"
रिनी यांनी पुढे आरोप केला की, तक्रार करूनही राहुल यांना पक्षात संधी मिळत राहिल्या. त्यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर इतर महिलांनी केलेले असेच आरोप पाहिल्यानंतर त्यांनी आवाज उठवायचा ठरवलं.
त्यांनी सांगितलं, "अलीकडे सोशल मीडियावर पाहिलं की अनेक महिलांना असेच अनुभव आले आहेत. पण त्या गप्प बसल्या. त्यामुळे मी सर्वांसाठी बोलायचं ठरवलं."
सध्या अभिनेत्री आणि मॉडेल रिनी अॅन जॉर्ज यांनी या प्रकरणात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.
बुधवारी, आरोपांनंतर भाजपने पलक्कड आमदार राहुल ममकुट्टाथिल यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राहुल ममकुट्टाथिल सध्या पलक्कड मतदारसंघाचे आमदार असून ते युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष आहेत. शफी परंबिल लोकसभेसाठी निवडून गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राहुल यांनी विजय मिळवला आणि आमदार झाले.


