Karnataka Maharashtra Border Dispute : सुप्रीम कोर्टात होणारी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या घडामोडीमुळे सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
Karnataka Maharashtra Border Dispute : दशकांपासून सुरू असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार होती. मात्र, अनेक कारणांमुळे महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
सुनावणी न होण्यामागचे कारण काय?
न्यायमूर्ती संजय कुमार आणि आलोक आराध्ये यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. ही तारीख गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच निश्चित झाली होती. मात्र, दोन्ही न्यायमूर्ती आज वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये इतर महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीत व्यस्त असल्याने सीमावादाची याचिका सुनावणीसाठी आली नाही.
केंद्राने भूमिका स्पष्ट करावी: अशोक चंदरगी
या घडामोडीनंतर बेळगावमध्ये प्रतिक्रिया देताना सीमा लढ्यातील नेते अशोक चंदरगी म्हणाले की, सीमावादाच्या बाबतीत केंद्र सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात राज्यातील खासदारांनी संसदेत आवाज उठवून केंद्रावर दबाव आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कार्यकर्त्यांची पुढील भूमिका
सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याने सीमाभागातील लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असतानाच, राजकीय पातळीवरही हा वाद सोडवण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे. पुढील सुनावणीची तारीख अद्याप जाहीर व्हायची आहे.


