भाजप खासदार कंगना रणौत हिने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी संशोधन करताना गांधी कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूमागे अनेक संशयास्पद योगायोग दिसल्याचा दावा तिने केला आहे.

मुंबई : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची (भाजप) खासदार कंगना रणौत हिने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिने सोनिया गांधी यांच्या राजकीय उदयावर प्रश्नचिन्ह उभे करत, गांधी कुटुंबाभोवती घडलेल्या घटनांची मालिका म्हणजे 'अनेक योगायोग' असल्याचे म्हटले आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरील एका पोस्टमध्ये कंगनाने आरोप केला आहे की, गांधी कुटुंबात सोनिया गांधींचा प्रवेश आणि त्यानंतर राजकीय घराण्यातील अनेक सदस्यांचे झालेले मृत्यू यावर अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्याकडे लोकांचे फारसे लक्ष गेले नाही. कंगनाने सांगितले की, 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी संशोधन करताना तिने भारतीय राजकारण आणि गांधी कुटुंबाचा सखोल अभ्यास केला असून त्याआधारावर तिने हे वक्तव्य केले आहे.

गांधी कुटुंबाच्या इतिहासाचा संदर्भ

सध्या जगभर चर्चेत असलेल्या एनव्हिडिया (Nvidia) हनी ट्रॅप वादाचा संदर्भ देत, अभिनेत्रीतून राजकारणी झालेल्या कंगनाने आपल्या पोस्टची सुरुवात केली, "सध्या प्रत्येकजण एनव्हिडिया हनी ट्रॅप वादावर बोलत आहे." त्यानंतर तिने गांधी कुटुंबाच्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारले, "इमर्जन्सी चित्रपटासाठी मी भारतीय राजकारण आणि गांधी कुटुंबावर भरपूर संशोधन केले आणि मला कबूल करावे लागेल की, एक गूढ परदेशी व्यक्ती गांधी कुटुंबात कशी येते, हे मला कधीच समजले नाही."

राजकीय वारशावरून आरोप

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मृत्यूचा उल्लेख करत या दुःखद घटनांचा संबंध गांधी कुटुंबाच्या राजकीय वारशाशी जोडला आहे. ती म्हणाली, "इंदिरा गांधी मारल्या गेल्या, संजय गांधी, राजीव गांधी, सत्तेचे सर्व संभाव्य वारसदार मारले गेले. त्यानंतर सत्तेसाठी केवळ एकच आणि ती पण सहानुभूतीची निवड उरली, ती म्हणजे सोनिया गांधी नावाची परदेशी व्यक्ती." कंगनाने या सर्व घटना म्हणजे 'अनेक योगायोग' असल्याचे सांगत, या प्रकरणाची अधिक चौकशी व्हायला हवी असे सुचवले आहे.

काँग्रेस नेतृत्वावर टीका

रणौत हिने सोनिया गांधींच्या राजकीय प्रभावावर आणि त्यांच्या कार्यकाळावरही टीका करत, त्यांनी परदेशी अजेंडा राबवल्याचा आरोप केला आहे. आपल्या मोठ्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने आरोप केला की, सोनिया गांधींनी परदेशी हितसंबंध खुलेआम जोपासले. तसेच तिने अनेक दशके काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. तिने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत आपल्या मेसेजचा शेवट केला की, सोनिया गांधींनी अनेक दशके सरकारचे नेतृत्व केले "तोपर्यंत जोपर्यंत २०१४ ची वेळ आली नाही."

२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका या भारताच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉईंट होता, ज्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) दहा वर्षांच्या सत्तेचा शेवट झाला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने एकहाती २८२ जागा जिंकल्या. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चा दारुण पराभव झाला आणि त्यांच्या जागा अवघ्या ४४ वर आल्या. या दणदणीत विजयानंतर, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपली १३ वर्षांची कारकीर्द पूर्ण करून २६ मे २०१४ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.