Jairam Ramesh Predicts Trouble with RN Ravis Appointment as Bengal Governor: बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी अचानक राजीनामा दिला आहे. काँग्रेसने मात्र यामागे राजकीय कारणं असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांची अवस्था माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासारखीच होईल, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटलं की, बोस यांच्या जागी येणारे आर. एन. रवी हे 'मोदी इकोसिस्टम'चाच एक भाग आहेत आणि त्यांची कार्यपद्धती त्यांना अडचणीत आणू शकते.
जयराम रमेश यांनी पुढे सांगितलं की, "आर. एन. रवी यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे नागालँडमधून हटवावं लागलं होतं. त्यानंतर ते तामिळनाडूमध्ये गेले, तिथेही ते अयशस्वी ठरले. आता त्यांना पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आलं आहे, जिथे ते नक्कीच डोकेदुखी ठरतील."
सी. व्ही. आनंद बोस यांनी बंगालच्या राज्यपालपदाचा अचानक राजीनामा दिला. भाजपने यामागे प्रकृतीचं कारण असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. याचप्रकारे, भारताचे १४ वे उपराष्ट्रपती राहिलेल्या जगदीप धनखड यांनीही प्रकृतीचं कारण देत राजीनामा दिला होता.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रात्री त्यांनी अनपेक्षितपणे राजीनामा दिला होता. त्यावेळीही भाजपने प्रकृतीचं कारण दिलं होतं. पण पश्चिम बंगालचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून काम केलेल्या धनखड यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारणं असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता.
भाजपचं स्पष्टीकरण
सी. व्ही. आनंद बोस यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी सांगितलं की, बोस यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे आणि त्यांना अनेक आरोग्य समस्या होत्या. बोस यांना कोणत्याही प्रकारे बाजूला सारलं गेलं नाही आणि राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा नेहमीच आदर केला गेला, असंही भट्टाचार्य म्हणाले. आता तामिळनाडूचे सध्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांची पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. रवी बंगालचे राज्यपाल झाल्यावर मणिपूरचे राज्यपाल ए. के. भल्ला यांच्याकडे तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार दिला जाऊ शकतो.
