Baby Girl Birth in Family after 52 Years : इंदूरमधील एका कुटुंबाची ५२ वर्षांची प्रतीक्षा संपली आणि त्यांच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं. ऑपरेशन थिएटरबाहेर कुटुंबियांनी केलेला जल्लोष आणि त्यांच्या भावूक प्रतिक्रियेचा व्हिडिओ डॉक्टरांनी शेअर केला आहे, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
इंदूर : इंदूरमधील एका कुटुंबात तब्बल ५२ वर्षांनी मुलीचा जन्म झाला. ऑपरेशन थिएटरबाहेर प्रार्थना, चिंता आणि उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांचा हा क्षण अश्रू, मिठी आणि जल्लोषात बदलला. इंदूरमधील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. बेला शाह जैन यांनी हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला.
या व्हिडिओमध्ये, कुटुंबीय ऑपरेशन थिएटरबाहेर हात जोडून प्रार्थना करताना आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने वाट पाहताना दिसत आहेत. काही क्षणांनंतर, डॉ. जैन बाळाला घेऊन बाहेर येतात. जन्माला आलेलं बाळ मुलगी आहे हे कळताच, कुटुंबिय टाळ्या वाजवून आणि जल्लोष करून आनंद साजरा करतात.
अनेक जण तर आपले आनंदाश्रू पुसताना दिसतात. काही जण भावूक होऊन आधी डॉक्टरला मिठी मारतात आणि मग एकमेकांना मिठी मारुन कुटुंबात मुलगी जन्माला आल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. डॉ. जैन यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "कधीकधी चमत्कार घडायला पिढ्या लागतात. ५२ वर्षांपासून फक्त मुलांचं स्वागत करणाऱ्या या कुटुंबाला अखेर एका मुलीचा आशीर्वाद मिळाला आहे. हा दिवस कायम लक्षात राहील."
हा व्हायरल व्हिडिओ पाहा
सोशल मीडियावर व्हिडडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया?
व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मुलीच्या जन्माचा इतक्या उत्साहाने आनंद साजरा करणारं कुटुंब पाहून खूप छान वाटलं, असं अनेकांनी म्हटलं आहे. तर एका युजरने कमेंट केली, "जेव्हा एखादं कुटुंब मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचीही आतुरतेने वाट पाहतं, तेव्हा माझं मन आनंदाने भरून येतं."
दुसऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाची आठवण शेअर केली, "मी सुद्धा माझ्या कुटुंबात चार पिढ्यांनंतर जन्मलेली पहिली मुलगी होते आणि आजही माझ्या नंतर दुसरी मुलगी जन्माला आलेली नाही."
हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिलं, “मला का रडू आलं माहीत नाही, पण हे माझ्या मनाला खूप भिडलं आहे. माझ्यासाठीही असंच काहीतरी घडो, हीच इच्छा.”

