Indian Railways Earns Praise for Providing Swift Medical Aid to Sick Toddler on Train: बंगळुरूहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका लहान बाळाची तब्येत अचानक बिघडली. घाबरलेल्या आईने TTE कडे मदत मागितल्यावर रेल्वेने तात्काळ पुढच्या स्टेशनवर डॉक्टरची सोय केली. या तत्पर सेवेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि नेटकरी रेल्वेचं कौतुक करत आहेत.
Indian Railways Earns Praise for Providing Swift Medical Aid to Sick Toddler on Train: चालत्या ट्रेनमध्ये लहान बाळ आजारी पडल्यावर कोणत्याही आई-वडिलांची घाबरगुंडी उडेल. पण एका कुटुंबासाठी भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचा हा अनुभव सुखावणारा ठरला. भावना नावाची एक डेंटिस्ट महिला तिच्या बाळासोबत १३ मार्च रोजी बंगळुरूहून गुजरातला ट्रेनने प्रवास करत होती. तिने तिचा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने सांगितलं की, तिच्या लहान बाळाने शेवग्याचं सूप प्यायल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. धावत्या ट्रेनमध्ये पुढे काय करावं, हेच त्यांना कळेनासं झालं होतं.
तिने तिच्या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे, “मी खूप घाबरले होते आणि TTE ला विचारलं की ट्रेनमध्ये औषधं कशी मागवता येतील? खरं तर मला फार अपेक्षा नव्हती.”
पण पुढे जे घडलं, ते पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी फक्त प्राथमिक मदत न देता, थेट डॉक्टरचीच सोय केली. ट्रेन हिंदुपुर स्टेशनवर पोहोचताच एक डॉक्टर बाळाला तपासण्यासाठी तिथे हजर होते. त्यांनी बाळाला तपासलं आणि गरजेची औषधं दिली, ज्यामुळे आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.
व्हिडिओमध्ये पुढे म्हटलं आहे, “त्यांनी आम्हाला औषधांचं व्यवस्थित बिलसुद्धा दिलं. ज्या वेगाने त्यांनी मदत केली, ते पाहून मला धक्का बसला आणि मी त्यांची खूप आभारी आहे.”
भावना यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “चालत्या ट्रेनमध्ये भीती ते दिलासा... माझ्या बाळाला मदतीची गरज होती आणि ती अपेक्षेपेक्षा खूप लवकर मिळाली.”
सोशल मीडियावर कौतुक
हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून, त्याला २७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचं कौतुक केलं आहे. विशेषतः लहान मुलांसोबत प्रवास करताना अशी मदत किती महत्त्वाची असते, यावर अनेकांनी भर दिला.
एका युझरने म्हटलं, “जेव्हा मदत शक्य असते, तेव्हा भारतीय रेल्वे ती पुढच्या स्टेशनवर उपलब्ध करून देते. या सेवेबद्दल खरंच आदर वाटतो. भारतीय रेल्वेला सलाम.”
दुसऱ्या एका युझरने लिहिलं, “एवढ्या गर्दीतही रेल्वेची चांगली बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद. अशा आपत्कालीन परिस्थितीत सहानुभूतीने आणि संवेदनशीलतेने मदत केली जाते.”
आणखी एका युझरने आपला अनुभव सांगताना लिहिलं, “माझ्यासोबतही असं झालं होतं. अचानक पोटात दुखायला लागलं, पण तीन स्टेशननंतर माझ्या बर्थवर औषधं मिळाली. रात्री १:५० वाजता मिळालेली ही मदत माझ्यासाठी खूप मोलाची होती. धन्यवाद भारतीय रेल्वे.”


