आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. लैंगिक छळाचे आरोप झाल्यामुळे भारतीय हॉकी अंपायर आणि टेक्निकल ऑफिशियल गुरिंदर सिंग संघा यांना जपानमधून थेट भारतात परत पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप असल्याचं समोर आलं आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकीमध्ये मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकी अंपायर आणि टेक्निकल ऑफिशियल गुरिंदर सिंग संघा यांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर लैंगिक छळाचे अनेक आरोप झाले आहेत. हॉकी इंडियाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेला सांगितले की, नागोयामध्ये असताना संघा यांनी मलेशियाच्या एका महिला हॉकी अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. एका हॉटेल कर्मचाऱ्यानेही त्यांच्यावर असाच आरोप केला आहे. या तक्रारींनंतर त्यांना तातडीने आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतात परत पाठवण्यात आले.
हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, संघा यांनी दोन दिवसांपूर्वीच जपान सोडले आहे. आता एशियन हॉकी फेडरेशनकडून (AHF) सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
एशियन हॉकी फेडरेशनच्या अहवालाची प्रतीक्षा
आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकी अंपायर आणि टेक्निकल ऑफिशियल्सची नियुक्ती एशियन हॉकी फेडरेशन करते. त्यामुळे या प्रकरणात फेडरेशनचा अहवाल खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे की, अहवालात तथ्य आढळल्यास संघा यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पण सध्या या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे गुरिंदर सिंग संघा यांच्यावरील आरोपांकडे सध्या फक्त आरोप म्हणूनच पाहिले जात आहे, सिद्ध झालेला गुन्हा नाही.
यापूर्वीही झाले होते आरोप
गुरिंदर सिंग संघा यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. २०२५ मध्ये रांची येथे झालेल्या हॉकी इंडिया लीग दरम्यान एका महिला अंपायरने त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी हॉकी इंडियाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. पण त्या तपासात संघा यांच्या विरोधात कोणताही भक्कम पुरावा मिळाला नाही, असा दावा हॉकी इंडियाने केला आहे. हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान समितीला संघा यांच्या विरोधात कोणताही भक्कम पुरावा मिळाला नव्हता.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेशी IOA किंवा हॉकी इंडियाचा काहीही संबंध नाही, कारण अधिकाऱ्यांची नियुक्ती AHF करते. यावर नागोयामध्ये असलेल्या AHF अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
