अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली आहे.
सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही युद्धबंदीला दुजोरा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना फोन आला. दरम्यान, आज (शनिवार) ५ वाजेपासून युद्धबंदी लागू करण्यात आली आहे.
दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा या विषयावर १२ मे रोजी चर्चा करणार आहेत. त्यानंतर यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले होत होते. भारतीय लष्कराचे जवान त्याला तोंड देत होते.
भारताने आपल्या अटींवर युद्धविराम केल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यावेळी ते युद्धबंदीची मोदींना माहिती देतील.
दरम्यान, कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारताची लष्करी कारवाई आणि संभाव्य युद्धबंदीवर संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.
याबाबत पाकिस्ताने उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार ट्विटरवर म्हणाले, की पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता!
याबाबत अमेरिकेचे सचिव मार्को रुबिओ म्हणाले, की गेल्या ४८ तासांत, मी आणि व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
भारत आणि पाकिस्तान सरकारांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.
शांतीचा मार्ग निवडण्यात पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांनी दाखवलेल्या शहाणपणा, विवेक आणि राजकारणाबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील.
यापूर्वी, केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, भविष्यात भारतावर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल आणि त्या हल्ल्याला त्यानुसार प्रत्युत्तर दिले जाईल. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. आतापर्यंत, जेव्हा जेव्हा भारतात कोणतीही दहशतवादी घटना घडत असे, तेव्हा राजनैतिक माध्यम सक्रिय असायचे. पण आता सरकारच्या नवीन धोरणानुसार, भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईने उत्तर दिले जाईल.
युद्ध कायदा म्हणजे काय?
जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाविरुद्ध युद्ध भडकवण्याच्या उद्देशाने ड्रोन, क्षेपणास्त्रे, हवाई हल्ले, सायबर हल्ले किंवा नौदल वेढा वापरतो आणि त्या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येते, तेव्हा ते युद्ध मानले जाते.


