अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्यामुळे विविध प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कुमार विश्वास यांनी हिंदी भाषेबाबतच्या राजकीय हेतूंवर थेट प्रहार केला.
मुंबई : सध्या देशभरात हिंदी भाषेवरुन मोठा वाद पेटलेला असताना, प्रसिद्ध हिंदी कवी आणि प्रभावशाली वक्ते कुमार विश्वास यांनी या विषयावर अत्यंत ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्यामुळे विविध प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनडीटीव्ही क्रिएटर्स फोरम’ या कार्यक्रमात बोलताना कुमार विश्वास यांनी हिंदी भाषेबाबतच्या राजकीय हेतूंवर थेट प्रहार केला.
“कोणतीही भाषा कोणालाही वेगळं करत नाही”
कार्यक्रमात विचारण्यात आले की, हिंदी लोकांना वेगळं करते का? यावर उत्तर देताना कुमार विश्वास म्हणाले, “कोणतीही भाषा कोणालाही वेगळं करत नाही. हिंदी ही अत्यंत प्रेमळ, गोड भाषा आहे. जे वाद आज घडत आहेत, त्यांचा उगम भाषेत नाही, तर राजकीय हेतूंमध्ये आहे.”
“हिंदी बोलणाऱ्याला मावशीच्या घरातल्या पाहुण्यासारखं वागवलं पाहिजे”
कुमार विश्वास म्हणाले, “हिंदी बोलणारा जर दुसऱ्या राज्यात गेला, जिथे हिंदी बोलली जात नाही, तर तिथची भाषा म्हणजे त्याच्यासाठी मावशीसारखी आहे. आईचा मुलगा आणि मावशीचा मुलगा कधी एकमेकांशी भांडतो का?”
“पुस्तकं जाळणं, कानशिलात मारणं हे कोणत्या संस्कृतीचं प्रतीक?”
आपल्या भाषणात त्यांनी वाढत्या असहिष्णुतेवरही प्रहार केला. ते म्हणाले, “आज तुम्ही रस्त्यावर बसून हिंदी पुस्तकं विकणाऱ्यांना मारत आहात, ती पुस्तकं जाळत आहात. एका रेस्टॉरंटमध्ये एखादा माणूस हिंदी बोलतोय म्हणून त्याला कानशिलात मारता, हे कोणत्या भारताचं दर्शन घडवताय?”
“हिंदीत चित्रपट पाहायचे, पण हिंदी बोलणाऱ्यांना हाणायचं?”
कुमार विश्वास यांचा रोख स्पष्ट होता. हिंदीवर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसावर हल्ले होत आहेत, पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर कोणीच काही बोलत नाही. “जर तुम्हाला हिंदी नको असेल, तर अमिताभ बच्चन यांचे ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं’ हे डायलॉग पण दुसऱ्या भाषेत बोलायला सांगा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
‘सरदार जी 3’ वादावरही नाराजी
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिचा पंजाबी चित्रपट 'सरदार जी 3' मध्ये समावेश झाल्यामुळे सुरु झालेल्या वादावरही कुमार विश्वास यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “मी प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. पण जर तुम्ही कलाकार म्हणून देश, सैन्य आणि सरकारविरोधात उभं राहत असाल, तर आमच्याकडून पाठवलेली शांतीची कबूतरं परत पाठवा.”
“सैनिक तिरंग्यात गुंडाळले जात आहेत आणि तुम्ही शत्रूच्या भूमिकेच्या बाजूने उभे?”
ते पुढे म्हणाले, “तुम्हाला स्टार कोणी बनवलं? सामान्य जनतेने, ज्यांनी तिकीट काढून तुमचे चित्रपट पाहिले, कार्यक्रम अटेंड केले आणि आज जे सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत, त्याच देशाची खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्रीच्या बाजूने तुम्ही उभे?”


