एका तरुणाने नोएडाच्या सेक्टर ९४ मधील सुपरनोव्हा बिल्डिंगमधून उडी मारून आत्महत्या केली. संभव जैन असं या तरुणाचं नाव असून तो गुरुग्रामच्या आयएमटी मानेसरचा रहिवासी होता. तो या बिल्डिंगमध्ये एक दिवसासाठी राहायला आला होता. पोलीस सध्या त्याचे चॅट्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत असून तो मानसिक तणावाखाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई : एका तरुणाने नोएडाच्या सेक्टर ९४ मधील सुपरनोव्हा कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभव जैन असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो हरियाणामधील गुरुग्रामच्या आयएमटी मानेसर भागात राहायचा. सुपरनोव्हाच्या 'अस्पिरा' बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. संभव तिथे एक दिवसासाठी एकटाच राहायला आला होता. बिल्डिंगच्या बाल्कनीतून एक तरुण खाली पडल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने उडी मारली, या घटनेचे थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आले आहेत.
सूचना: खालील व्हिडिओ विचलित करणारे असू शकतात. प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत.
पोलीस करत आहेत मृत्यूच्या कारणांचा तपास
पोलिसांच्या सांगण्यानुसार, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
प्राथमिक तपासात संभव खूप मानसिक तणावाखाली असल्याचं समोर आलं आहे. त्याला काही आर्थिक अडचणी होत्या आणि तो गेल्या चार दिवसांपासून घराबाहेर होता, अशीही माहिती मिळतेय.
पोलीस या प्रकरणाचा तपास करताना संभव आणि त्याच्या वडिलांमधले व्हॉट्सॲप चॅट्स तपासत आहेत. पण त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूचं कोणतंही एक कारण सांगणं घाईचं ठरेल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी
सेक्टर १२६ पोलीस स्टेशनच्या टीमने घटनास्थळी जाऊन तिथे उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली. फॉरेन्सिक टीमनेही जागेची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
पोलीस नेमकं काय घडलं हे समजून घेण्यासाठी बिल्डिंग आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
संभवने ही रूम कशी बुक केली आणि ती कोणाच्या नावावर होती, याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलीस त्याचे ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे तपासत आहेत. तो नोएडामध्ये का आला होता आणि कोणाला भेटणार होता का, या प्रश्नांची उत्तरेही पोलीस शोधत आहेत.
पोलिसांनी संभवच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सुरुवातीच्या तपासात आर्थिक अडचण आणि मानसिक तणाव ही कारणे समोर आली असली, तरी पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. तुम्हाला मानसिक मदतीची गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या मनात असे विचार येत असतील तर कृपया 'दिशा' हेल्पलाईनवर संपर्क साधा. टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1056, 0471-2552056)


