गोरखपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. बॉयफ्रेंडशी बोलल्यामुळे आई ओरडल्याने, १५ वर्षांची एक मुलगी थेट १०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढली.
मुंबई : गोरखपूरमध्ये रविवारी एक विचित्र घटना घडली. बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलल्यामुळे आई रागावल्याने, एक १५ वर्षांची मुलगी थेट १०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढली. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एम्स (AIIMS) पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव झारखंडी कॉलनीत घडली.
ही मुलगी शिवपूर आवास विकास कॉलनीची रहिवासी असून ती नववीत शिकते. ती जवळपास तीन तास टाकीवर पाय सोडून बसली होती. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
२० मिनिटं हवेत लटकत होती मुलगी, पोलिसांनी खेचून वाचवलं
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीला खाली उतरण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. तेव्हा एम्स पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी जागृती खरवार (Jagriti Kharwar) यांनी स्वतः टाकीवर चढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुलीशी बोलून तिचा विश्वास जिंकला आणि संधी मिळताच तिला मागून पकडले.
जागृती यांनी पकडताच मुलीने खाली उडी मारली. पण त्यांनी तिचा हात आणि कपडे घट्ट पकडून ठेवले. जागृती यांनी तिला सोडले नाही आणि ती मुलगी सुमारे २० मिनिटे हवेत लटकत होती. त्यानंतर टाकीवर असलेल्या इतर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी मुलीला वर खेचले.
नंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मुलीला खाली उतरवले. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे एक मोठी दुर्घटना टळली. मुलीला सुखरूप वाचवण्यात आले असून तिला कोणतीही दुखापत झालेली नाही.


