देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. 8 ऑगस्टला दिल्ली, मुंबईसह देशातील प्रमुख शहरातील आजच्या किंमती काय आहेत जाणून घ्या.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. तरी सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही वाढ फायदेशीर ठरत आहे. 7 ऑगस्टला सोन्याचा दर 1,49,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर 2,39,900 रुपयांवर (प्रति किलो) पोहोचला आहे.

सोन्याच्या दरात वाढ का होत आहे?

जागतिक पातळीवरील आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावासह आंतरराष्ट्रीय घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जात असल्याने त्याची मागणी वाढत आहे. याशिवाय अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नात झालेली घट देखील सोन्याच्या दरासाठी सकारात्मक ठरत आहे. डॉलर कमजोर झाल्यास आणि बाँडचे उत्पन्न कमी झाल्यास गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक आकर्षित होतात.

कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे महागाई कमी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाल्याचे मानले जात आहे. व्याजदरातील बदलाच्या अपेक्षांचाही सोन्याच्या दरावर परिणाम होतो.

एका दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 6 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा दर 1,48,440 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 7 ऑगस्टला हाच दर वाढून 1,49,900 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली. 6 ऑगस्टला चांदीचा दर 2,25,674 रुपये प्रति किलो होता. 7 ऑगस्टला तो वाढून 2,39,900 रुपये प्रति किलो झाला.

आजचा सोन्याचा भाव किती?

  • चेन्नई : 24K सोन्याचा दर 14,999 रुपये प्रति ग्रॅम
  • मुंबई : 24K सोन्याचा दर 14,990 रुपये प्रति ग्रॅम
  • दिल्ली : 24K सोन्याचा दर 15,005 रुपये प्रति ग्रॅम
  • कोलकाता : 24K सोन्याचा दर 14,990 रुपये प्रति ग्रॅम
  • पुणे : 24K सोन्याचा दर 14,990 रुपये प्रति ग्रॅम
  • नागपूर : 24K सोन्याचा दर 14,990 रुपये प्रति ग्रॅम