२०२६ मध्ये गोवा आणि बंगळुरूमध्ये राहण्याचा खर्च किती असेल? घरभाडं, किराणा, प्रवास आणि इतर बिलांची तुलना करून तुमच्या बजेटनुसार कोणतं शहर बेस्ट आहे ते समजून घ्या.

गोवा म्हटलं की समुद्रकिनारे आणि सुट्ट्या घालवण्याचं ठिकाण डोळ्यांसमोर येतं. तर दुसरीकडे, बंगळुरू नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आकर्षित करतं. पण जर तुम्हाला यापैकी एका शहरात राहायला जायचं असेल, तर खिशाला कोणतं शहर जास्त परवडेल?

गोव्यात नेहमीच्या पर्यटन स्थळांच्या बाहेर राहिल्यास खर्च कमी येऊ शकतो. तर बंगळुरूमध्ये तुमचा खर्च तुम्ही कुठे राहता आणि तुमचा रोजचा प्रवास किती आहे, यावर अवलंबून असतो.

१. महिन्याचं घरभाडं: कुठे स्वस्त मिळतं घर?

गोव्यात १ बीएचके (1BHK) फ्लॅटचं भाडं महिन्याला १२,००० ते ४०,००० रुपयांच्या घरात असतं. तर बंगळुरूमध्ये हेच भाडं १०,००० ते ४२,००० रुपयांपर्यंत असू शकतं. अर्थात, हा खर्च तुम्ही कोणत्या भागात राहता आणि फ्लॅटमध्ये किती सोयी-सुविधा (फर्निश्ड, सेमी-फर्निश्ड, अनफर्निश्ड) आहेत, यावर ठरतो.

गोव्यातील कांदोळी आणि आसगाव सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर घरभाडं जास्त असतं. तसंच बंगळुरूमध्ये मध्यवर्ती भाग, आयटी कंपन्या आणि कॉलेजच्या आसपास घर घेणं महाग पडतं.

२. जेवण आणि किराणा मालाचा खर्च

जेवणाचा खर्च तुम्ही स्वतः स्वयंपाक करता, बाहेरून मागवता की हॉटेलमध्ये जेवता यावर अवलंबून असतो. गोव्यात रात्रीच्या जेवणासाठी किमान ३०० रुपये खर्च येतो. त्यामानाने बंगळुरूमध्ये जेवण थोडं स्वस्त म्हणजे २५० रुपयांत मिळतं.

दोन्ही शहरांमध्ये किराणा दुकानं आणि परवडणारी हॉटेल्स आहेत. किराण्यावर किती खर्च होईल हे कुटुंबातील सदस्य आणि तुमच्या राहणीमानावर अवलंबून असतं. पण एका व्यक्तीसाठी महिन्याला साधारण ३,००० ते १०,००० रुपये किराण्यावर खर्च होतात.

३. प्रवास आणि वाहतूक व्यवस्था

बंगळुरूमध्ये बस, मेट्रो आणि काही मार्गांवर लोकल ट्रेनची सुविधा आहे. शिवाय उबर (Uber), रॅपिडो (Rapido) आणि नम्मा यात्री (Namma Yatri) सारखे ॲप्सही आहेत. पण तिथली ट्रॅफिक, हवामान आणि अंतर यामुळे प्रवासाचा खर्च वाढू शकतो.

गोव्यात टॅक्सी आणि बसेस चालतात. पण तुम्ही कुठे राहता आणि काम करता, यावर तिथली सार्वजनिक वाहतूक सोयीची वाटेलच असं नाही. जे लोक स्वतःची दुचाकी किंवा कार वापरतात, त्यांना पेट्रोल, मेंटेनन्स आणि इन्शुरन्सचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो.

४. वीज, पाणी आणि इंटरनेट बिल

गोव्यात एका व्यक्तीसाठी वीज आणि पाण्याचा महिन्याचा खर्च साधारण २,५०० ते ३,५०० रुपये येतो. तिथे ब्रॉडबँड इंटरनेटसाठी महिन्याला ८९० रुपये मोजावे लागतात. तर बंगळुरूमध्ये या बिलांसाठी ३,५०० ते ५,००० रुपये खर्च येऊ शकतो. हा खर्च घराचा आकार, घरातील माणसं आणि तुमच्या वापरावर अवलंबून असतो.

५. गोवा की बंगळुरू: कोणतं शहर स्वस्त?

जे लोक 'वर्क फ्रॉम होम' करतात आणि ज्यांना पर्यटकांच्या गर्दीपासून दूर राहायचं आहे, त्यांच्यासाठी गोवा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पण ज्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं आहे, त्यांच्यासाठी बंगळुरू जास्त सोयीचं ठरेल. बंगळुरूच्या तुलनेत गोव्यातील शांत आणि आडवळणाच्या भागात राहणं नक्कीच स्वस्त पडतं.

थोडक्यात सांगायचं तर, गोव्यात राहण्याचा महिन्याचा खर्च २०,००० ते ५०,००० रुपयांच्या घरात जातो. तर बंगळुरूमध्ये हाच खर्च २५,००० ते ६५,००० रुपयांपर्यंत पोहोचतो.