भारताचे टेनिस स्टार लिअँडर पेस यांचे वडील व्हेस पेस यांचे आज निधन झाले. हॉकी संघाकडून कांस्यपदक जिंकण्यासोबतच ते क्रीडा वैद्यकशास्त्रात तज्ज्ञ होते. त्यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
१९७२ म्युनिक ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा सदस्य असलेले डॉ. व्हेस पेस यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. डॉ. पेस हे ऑलिंपिक कांस्यपदक विजेते टेनिसपटू लिअँडर पेस यांचे वडील होते.
डॉ. पेस यांना पार्किन्सन्स या आजाराच्या शेवटच्या टप्प्याचे निदान झाले होते आणि मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भारतीय हॉकी संघात मिडफिल्डर म्हणून खेळल्यानंतर डॉ. पेस यांनी खेळजगतात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी यांसारखे अनेक खेळ खेळले. १९९६ ते २००२ दरम्यान ते इंडियन रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदे (ACC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अँटी-डोपिंग शिक्षण कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली.
ते स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉक्टर होते आणि ACC, BCCI तसेच अनेक क्रीडा संघटनांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून कार्यरत होते. ते कॅल्कत्ता क्रिकेट अँड फुटबॉल क्लबचे अध्यक्षसुद्धा होते.
डॉ. पेस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना हॉकी इंडियाने त्यांना "भारतीय क्रीडाजगताचा अढळ आधारस्तंभ" आणि "भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील करिष्माई मिडफिल्डर" असे गौरवले.
लिअँडर पेस नेहमीच आपल्या वडिलांना प्रेरणास्थान मानतात. एका जुन्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "माझे वडील माझे सर्वोत्तम मित्र आहेत. लहानपणी आम्ही दोघे मिळून ब्राझीलचा वर्ल्ड कप सामना पाहायचो."


