सार
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीला रेल्वेच्या नावाबाबत प्रवाशांमध्ये झालेला गोंधळ कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या १८ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या भीषण चेंगराचेंगरीच्या घटनेला रेल्वेच्या नावाबाबत प्रवाशांमध्ये झालेला गोंधळ कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या तीन जणांचा रविवारी मृत्यू झाल्याने दुर्घटनेत बळी पडणाऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे व्यापक संताप व्यक्त होत असून, विरोधी पक्षांनी या घटनेला संस्थात्मक हत्या म्हणून संबोधले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र रेल्वे विभागाने प्रवाशांमध्ये झालेल्या गोंधळामुळेच ही घटना घडली असल्याचे म्हटले आहे. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक शेवटच्या क्षणी बदलल्याने चेंगराचेंगरी झाली, हा आरोप खोटा असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तरीही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वेने दिले असून, त्या आधारावर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वे विभागाने १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मृतांमध्ये ११ महिला, दोन पुरुष, एक बालक आणि ४ मुले आहेत.
नावातील गोंधळ:
प्रयागराजला शनिवारी रात्री एकूण ४ रेल्वे जाणार होत्या. त्यापैकी तीन रेल्वे उशिरा होत्या. दरम्यान, प्रयागराजला जाणारी ‘प्रयागराज एक्सप्रेस’ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर येणार होती. त्यासाठी लोक वाट पाहत होते. त्याचवेळी शेजारील प्लॅटफॉर्म १२ वरून प्रयागराज स्पेशल ट्रेन सुटणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी प्लॅटफॉर्म १४ वर असलेल्या प्रवाशांना आपली रेल्वे प्लॅटफॉर्म १२ वर येणार असल्याचा चुकीचा समज झाला. त्यामुळे हजारो लोक एकाचवेळी ४२ पायऱ्या चढून त्यानंतर २५ फूट रुंदीच्या ओव्हरब्रिजवरून शेजारील प्लॅटफॉर्म १२ कडे धावले. असे जाताना काही महिला प्लॅटफॉर्म १२ च्या बाजूला पायऱ्या उतरताना कोसळल्या. तेव्हा तोल जाऊन आणखी काही लोक त्यांच्यावर कोसळले. हे कळताच शेकडो लोक त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत महिला आणि मुलांसह अनेकांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.
कसा झाला अपघात?
१. शनिवारी रात्री दिल्लीहून प्रयागराजला ४ रेल्वे जाणार होत्या. ३ रेल्वे उशिरा होत्या.
२. तासाला १५०० रुपयांना जनरल डब्याची तिकिटे विकली जात होती. मोठ्या संख्येने लोक होते
३. ‘प्रयागराज एक्सप्रेस’ रेल्वे प्लॅटफॉर्म १४ वर येणार होती. त्यासाठी प्रवासी वाट पाहत होते
४. त्याचवेळी १२ व्या प्लॅटफॉर्मवरून ‘प्रयागराज स्पेशल’ रेल्वे सुटणार असल्याची घोषणा झाली
५. आपली रेल्वेच ती असल्याचे समजून लोक उठावले आणि धावू लागले