Delhi High Court on Patanjali: पतंजलीने आपल्या जाहिरातीत इतर च्यवनप्राश ब्रँड्सना 'धोका' म्हटल्याने डाबरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने पतंजलीला फटकारले. 

Delhi High Court on Patanjali: पतंजली आयुर्वेदने आपल्या जाहिरातींमध्ये इतर सर्व च्यवनप्राश ब्रँड्सना ‘धोका’ (फसवणूक) म्हणत स्वतःचा ब्रँड खरा असल्याचा दावा केला. यावर दिल्ली हायकोर्टने गुरुवारी योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला चांगलेच सुनावले. “तुम्ही इतर सर्वांना ‘धोका’ म्हणता आणि स्वतःला खरा म्हणता हे कसं योग्य ठरू शकतं?” असा प्रश्न न्यायमूर्ती तेजस कार्य यांनी उपस्थित केला.

डाबरची याचिका, कोर्टाचे निरीक्षण

डाबर इंडियाने पतंजलीविरोधात जाहिरातींवर बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं, “तुम्हाला स्वतःला सर्वोत्तम म्हणायचं असेल, हरकत नाही; पण इतरांना ‘धोका’ म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही ‘इतर ब्रँड्स कमी दर्जाचे आहेत’ असं म्हणू शकता, पण ‘फसवे’ नाही. ‘धोका’ हा नकारात्मक आणि अपमानास्पद शब्द आहे. त्यामुळे तुम्ही इतर कंपन्यांना फसवणूक करणारे म्हणत आहात, आणि लोक काहीतरी बनावट खात आहेत असं सूचित होतं,” असे न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.

डाबरची तक्रार, खोटे दावे आणि दिशाभूल

डाबरने पतंजलीवर आरोप केला की, त्यांनी त्यांच्या च्यवनप्राशमध्ये “५१ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि केशर” असल्याचा दावा केला, जो २०१४ मध्ये केंद्र सरकारने दिशाभूल करणारा ठरवला होता. तसेच, “स्पेशल” असा उपसर्ग वापरणं ही औषध नियमांच्या कलम 157(1-B) चे उल्लंघन असल्याचंही डाबरने नमूद केलं आहे, कारण त्यामुळे पारंपरिक आयुर्वेदिक औषधाचं स्वरूप बदलतं.

डाबरचा युक्तिवाद

वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी न्यायालयात म्हटलं, “च्यवनप्राश हा उत्पादनाचा एक वर्ग आहे. पतंजलीने सर्व इतर च्यवनप्राश ब्रँड्सना ‘धोका’ म्हटल्यामुळे त्यांनी संपूर्ण उद्योगावरच डाग आणला आहे.” ते पुढे म्हणाले, “‘धोका’ हा अपमानास्पद शब्द आहे. पतंजली म्हणतं की ‘मी इतरांना ओळखत नाही’, पण प्रत्यक्षात ते सर्वांना एकाच रंगात रंगवत आहेत. आणि हे शब्द एका योगगुरूकडून येत असल्यामुळे त्याला अधिक गांभीर्य प्राप्त होतं, कारण लोक योगगुरूंना सत्याशी जोडतात.”

सेठी यांनी आणखी सांगितले की, “डाबर गेल्या 100 वर्षांपासून कायदेशीर आणि प्रमाणित पद्धतीने च्यवनप्राश तयार करत आहे. असं उत्पादन ‘धोका’ म्हणणं अयोग्य आहे. पतंजलीची जाहिरात लोकांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठीच आहे. आमचा मार्केट शेअर 61% आहे, आणि त्या जाहिरातीला 9 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत – यावरून लोक किती संवेदनशील आहेत हे दिसून येतं.”

पतंजलीचा बचाव

पतंजलीच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी प्रतिवाद केला की, “आमची जाहिरात ही फक्त puffery किंवा अतिशयोक्ती आहे. कायद्यानुसार ती परवानगीयोग्य आहे. आम्ही म्हणत नाही की इतर सर्व ब्रँड निष्क्रिय किंवा फसवे आहेत. फक्त इतकंच सांगत आहोत की ‘इतरांना विसरा आणि आमचं उत्पादन वापरा’. आम्हाला स्वतःला सर्वोत्तम म्हणण्याचा अधिकार आहे.” ते पुढे म्हणाले, “डाबर या बाबतीत अति-संवेदनशील वागत आहे.”

हायकोर्टाने राखून ठेवला निर्णय

संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला असून, लवकरच या प्रकरणावर आदेश दिले जाणार आहेत.