Congress Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई एक चूक होती. त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींना आपल्या प्राणाने चुकवावी लागली.

Congress Politics : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई चुकीची होती, असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींना आपल्या प्राणाने चुकवावी लागली, असेही चिदंबरम यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हिमाचल प्रदेशातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेली 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई एक चूक होती. या कारवाईच्या परिणामीच त्यांचा जीव गेला," असे ते म्हणाले.

ऑपरेशन ब्लू स्टार

१९८४ मध्ये, शिखांचे पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात भिंद्रानवाले यांच्यासह दहशतवादी लपले असून त्यांनी शस्त्रे लपवून ठेवली असल्याचे तत्कालीन केंद्र सरकारने म्हटले होते. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले होते.

सुवर्ण मंदिरात झालेल्या या कारवाईमुळे शीख समुदायात मोठा संताप निर्माण झाला. या घटनेनंतर काही महिन्यांतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

यानंतर झालेल्या शीखविरोधी दंगलीत अनेक जण मारले गेले. या दंगलीला तत्कालीन काँग्रेस पक्षच जबाबदार होता आणि प्रमुख नेत्यांच्या चिथावणीवरूनच ही दंगल घडली, असे आरोप झाले होते हे उल्लेखनीय आहे.