CJP Meeting With J.P. Nadda : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी आज शुक्रवारी सरकारसोबत बैठक झाली. या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून उद्यापर्यंत वेळ मागण्यात आला आहे.

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी कॉचरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. दिल्लीतील विठ्ठल हाऊस इथे ही बैठक पार पडली. या बैठकीआधीच कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी आमचं आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. त्यांच्या राजीनाम्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट मान्य केली जाणार नाही, ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहील, असं सांगितलं.

केंद्र सरकारशी बैठक पार पडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की सरकारने त्यांना आज चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. सरकारसोबत चर्चेची ही त्यांची दुसरी फेरी होती. सरकारसोबत झालेल्या बैठकीत ३ मागण्या मांडण्यात आल्या. त्यापैकी महत्त्वाची मागणी म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. याच महत्त्वाच्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर देण्यासाठी सरकारने उद्या शनिवार दुपारपर्यंत वेळ मागितला आहे. सरकार ही मागणी मान्य करेल अशी आशा असल्याचं CJP कडून सांगण्यात आलं आहे.

शिवाय अभिजित दीपके यांनी पुढे असंही सांगितलं, की हे आंदोलन देशातील तरुणांचं आहे, आंदोलन केवळ सोनम वांगचुक किंवा अभिजित दीपके यांच्यापुरतं मर्यादित नाही. हे आंदोलन विरोधी पक्षांचंदेखील नाही. सरकारला या आंदोलनावर तोडगा हवा असेल, जर हे आंदोलन थांबावं असं वाटत असेल, तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच एकमेव उपाय आहे.

दुसऱ्या मागण्यांबद्दल बोलताना कॉकरोच जनता पार्टीने सांगितलं, की आत्महत्या केलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देणे आणि विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या FIR, कायदेशीर खटले मागे घेणे या दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आजची 'कॉन्स्टिट्यूशन क्लब'मध्ये होणार होती, पण केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही बैठक दिल्लीतील विठ्ठल हाऊस घेण्यात आली. ही बैठक विठ्ठल हाऊसच्या ५०४ क्रमांकाच्या खोलीत झाली

उद्या शनिवारी पुन्हा चर्चा - जे.पी. नड्डा

आज विठ्ठल हाऊसमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर जे.पी. नड्डा यांनी सांगितलं, की CJP च्या तीन मागण्या होत्या. त्यावर उद्या दुपारी पुन्हा भेटून चर्चा होईल.