बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांसाठी 'असुरक्षित' घोषित करण्यात आले आहे. चेंगराचेंगरी घटनेच्या चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालामुळे महिला वर्ल्ड कप 2025 चे आयोजन अडचणीत आले आहे.
Bengaluru Stampede: बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम आता मोठ्या कार्यक्रमांसाठी 'असुरक्षित' घोषित करण्यात आले आहे. महिला वर्ल्ड कप 2025 चे सामने इथे खेळवले जाणार होते, मात्र चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीनंतर सादर झालेल्या अहवालामुळे हे आयोजन अडचणीत आले आहे.
न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा आयोगाचा अहवाल
कर्नाटक सरकारकडून नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांसाठी योग्य नाही. या आयोगाची नियुक्ती IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजय सोहळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरी घटनेनंतर करण्यात आली होती. त्या घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
स्टेडियममध्ये सुरक्षेच्या गंभीर त्रुटी
आयोगाने स्टेडियमबाबत स्पष्टपणे नमूद केलं आहे की, त्याचं आर्किटेक्चरल डिझाईन आणि रचना मोठ्या गर्दीसाठी योग्य नाही. त्यात आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन, प्रवेश-निर्गम मार्ग, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था यांसारख्या बाबतीत धोकादायक कमतरता आहेत.
महिला वर्ल्ड कप 2025 वर परिणाम
महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 साठी चिन्नास्वामी स्टेडियमची निवड भारतातील चार प्रमुख मैदानांपैकी एक म्हणून झाली होती. ३० सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील उद्घाटन सामना, सेमीफायनल आणि फायनल सुद्धा येथे खेळवले जाणार होते. मात्र, न्यायालयीन आयोगाच्या अहवालामुळे हे सामने इतर सुरक्षित मैदानांवर हलवण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेतला जाऊ शकतो.
सार्वजनिक सुरक्षेचा धोका असल्याचा इशारा
आयोगाने स्पष्ट केलं आहे की चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती झाल्यास, सार्वजनिक सुरक्षेला, शहरातील वाहतुकीला आणि आपत्कालीन व्यवस्थापनाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील मोठे कार्यक्रम इतर आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा सुविधा असलेल्या स्थळी आयोजित करावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
महत्वाच्या कमतरता, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काय नाहीये?
गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र क्यूइंग आणि सर्क्युलेशन क्षेत्र
आवश्यक प्रवेश व निर्गम दरवाजे
सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटक केंद्रांशी सुसंगत जोडणी
आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार आपत्कालीन बाहेर पडण्याची योजना
गर्दीस सामावून घेणारी पार्किंग व ड्रॉप-ऑफ सुविधा
जवाबदारी निश्चित, काही राजीनामे
या अहवालात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुराम भट्ट, माजी सचिव ए. शंकर, माजी कोषाध्यक्ष ई. एस. जयराम, RCB उपाध्यक्ष राजेश मेनन, तसेच DNA एंटरटेनमेंटचे एमडी टी. वेंकट वर्धन आणि व्हीपी सुनील माथूर यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. घटनेनंतर ए. शंकर आणि ई.एस. जयराम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता.
आगामी स्पर्धांवरही परिणाम
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ११ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महाराजा टी२० ट्रॉफीचे सामने देखील नियोजित आहेत. मात्र, ही स्पर्धा प्रेक्षकांविना (behind closed doors) खेळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिन्नास्वामी स्टेडियम आता भविष्यातील महत्त्वाच्या स्पर्धांसाठी संशयाच्या भोवऱ्यात आहे. आयोगाच्या निष्कर्षांनुसार, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने स्टेडियममधील मोठे कार्यक्रम टाळावे, असं ठाम मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे, महिला वर्ल्ड कप 2025 ची उद्घाटन, सेमीफायनल आणि फायनल सामन्यांची जागा बदलली जाऊ शकते.


