Central Govt : डीएमध्ये 5 टक्के वाढीची शक्यता, 8व्या वेतन आयोगापूर्वीच खूशखबर...
Central Government : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारीमध्ये 5 टक्के डीए वाढ मिळण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच डीए 63 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊया.

8व्या वेतन आयोगाची घोषणा, कर्मचाऱ्यांची दिवाळी!
दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे सामान्य माणसाचे खिसे रिकामे होत आहेत. घरभाडे, रेशन, औषधे, मुलांचे शिक्षण सर्वच महाग झाले आहे. अशात पगार किंवा पेन्शन वाढीची बातमी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरते. अशीच एक आनंदाची बातमी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जानेवारीमध्ये येणार आहे.
8व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात डीए सुमारे 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
डीए 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे का?
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर 2025 साठी AICPI-IW (औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक) आकडेवारी जाहीर केली आहे. हा निर्देशांक 148.2 अंकांवर नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए आणि पेन्शनधारकांचा डीआर थेट या निर्देशांकावर अवलंबून असतो.
देशभरातील अन्न, घर, कपडे, इंधन, आरोग्य, वाहतूक आणि शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या किमतींमधील बदल हा निर्देशांक दर्शवतो. सध्याच्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारीत डीए आणि डीआरमध्ये 5 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे.
डीए 63 टक्क्यांवर पोहोचणार
केंद्र सरकारने यापूर्वी डीए 4% वाढवून 58% केला होता. ताज्या अंदाजानुसार, जानेवारीत 5% वाढ मंजूर झाल्यास एकूण डीए 63% पर्यंत पोहोचू शकतो. अंतिम निर्णय डिसेंबर 2025 च्या AICPI-IW डेटानंतर घेतला जाईल. सरकार लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?
केंद्र सरकारने अधिकृतपणे 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने आपले कामही सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा आहेत. प्राध्यापक पुलक घोष अर्धवेळ सदस्य म्हणून, तर पंकज जैन सदस्य-सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत. आयोगाची कार्यप्रणालीही निश्चित झाली आहे.
सरकारी वेळापत्रकानुसार, या आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू व्हायला हव्यात. तथापि, अहवाल तयार करणे आणि अंमलबजावणी प्रक्रियेस सुमारे दोन वर्षे लागू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन 7व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसारच राहतील. या काळात वाढणारा डीए हाच कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ दिलासा असेल.
50 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. पगार किती वाढणार?
जर जानेवारीमध्ये अंदाजानुसार डीए वाढ झाली, तर त्याचा थेट फायदा 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना होईल. त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसेल. बाजारातील महागाई आणि वाढत्या किमती पाहता, ही वाढ कर्मचाऱ्यांचे घरगुती बजेट नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीत 5 टक्के डीए वाढल्यास त्यांच्या पगारात स्पष्ट वाढ दिसेल. ही वाढ कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर (Basic Pay) अवलंबून असेल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास, 5 टक्के डीए वाढीमुळे त्याचा मासिक पगार 900 रुपयांनी वाढेल. म्हणजेच, वर्षाला 10,800 रुपये अतिरिक्त मिळतील.
त्याचप्रमाणे, जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56,900 रुपये असेल, तर त्यांना दरमहा 2,845 रुपये, म्हणजेच वर्षाला 34,140 रुपयांपर्यंत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. हे केवळ अंदाज आहेत.

