BTech Graduate Rapido Driver : रॅपीडो राईडनंतर एका इंजिनिअरिंग पदवीधर ड्रायव्हरने प्रवाशाला व्हॉट्सॲपवर नोकरीसाठी मदतीची विनंती केली. प्रवाशाने हा मेसेज सोशल मीडियावर शेअर केल्यावर या घटनेवर मोठी चर्चा सुरू झाली.
नवी दिल्ली : रॅपीडो राईड पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने प्रवाशाला ड्रायव्हरकडून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. हा मेसेज पाहून प्रवासी चांगलाच चक्रावला. कारण हा मेसेज नेहमीप्रमाणे फिडबॅक किंवा रेटिंग देण्याबद्दल नव्हता. त्याऐवजी, ड्रायव्हरने नोकरी मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. हा रॅपीडो ड्रायव्हर एक इंजिनिअरिंग पदवीधर तरुण होता. प्रवाशाने या मेसेजचा स्क्रीनशॉट रेडिटवर (Reddit) शेअर केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर ही घटना चर्चेचा विषय बनली.
प्रवाशाला व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, 'हॅलो, गुड मॉर्निंग सर. मी एप्रिल २०२४ मध्ये B.Tech पूर्ण केलं आहे. सध्या मी नोकरी शोधतोय, फ्रेशर आहे. तुमच्याकडे काही जागा रिकाम्या असतील तर कृपया मला कळवाल का सर?'
या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी देशातील बेरोजगारी आणि नोकरीच्या बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवलं. काही जणांनी त्या तरुणाच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे, प्रवाशाचा व्हॉट्सॲप नंबर घेऊन त्याला वैयक्तिक मेसेज पाठवणं हे गोपनीयतेचं उल्लंघन नाही का? हे व्यावसायिकतेला धरून नाही, असं मतही काही लोकांनी मांडलं आहे.
एका युजरने कमेंट केली, 'मी या तरुणाच्या मेहनतीचं आणि प्रयत्नांचं कौतुक करतो.' तर दुसऱ्याने लिहिलं, 'शक्य असेल तर या मुलाला एखाद्या कंपनीत रेफरन्स देऊन मदत करा.' 'त्याची परिस्थिती समजून घ्या, नोकरी मिळवण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्याने असं केलं असेल,' अशाही कमेंट्स आल्या.
काही युजर्सनी मात्र यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. एकाने लिहिले, 'प्रवासी पुरुष असल्यामुळे कदाचित ही गोष्ट मोठी वाटत नसेल. पण अशा प्रकारे एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं योग्य नाही. जर हा मेसेज एखाद्या महिलेला आला असता, तर प्रकरण वेगळं असतं.'


