दिल्लीतील एका मॅरेज कन्सल्टंटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात हा व्यक्ती चक्क माईकवरून एका उपवर मुलीचा बायोडाटा आणि तिच्या अपेक्षा वाचून दाखवत आहे. लिलाव पुकारावा तशा या प्रकारामुळे इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींना हे मजेशीर वाटलंय, तर काहींनी यावर सडकून टीका केली आहे.

दिल्ली: जुने दिवस आता गेले, जेव्हा लोक मुला-मुलींचे विवाह जुळवण्यासाठी फक्त नातेवाईक, शेजारी किंवा मित्रमंडळींवर अवलंबून असायचे. आता वर्तमानपत्रातील जाहिरातींपासून ते मॅट्रिमोनी साईट्स आणि डेटिंग अ‍ॅप्सपर्यंत सगळंच बदललं आहे. पण आता दिल्लीत चक्क माईकवरून बायोडाटा वाचून दाखवण्याचा एक नवा आणि अजब प्रकार समोर आला आहे. यामुळे 'रिश्ता' शोधण्याची पद्धत एका वेगळ्याच लेव्हलवर गेली असून याचीच सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

दिल्लीमधील एका मॅरेज कन्सल्टंटचा (विवाह सल्लागार) व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. उपवर वधू-वरांच्या अपेक्षा सांगण्याची त्याची ही पद्धत एकदम हटके आहे. लोकांच्या हातात बायोडाटा देण्याऐवजी, हा माणूस चक्क माईक हातात घेऊन एका मुलीची माहिती आणि तिच्या घरच्यांना कसा नवरा हवाय, हे भरचौकात ओरडून सांगताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हा कन्सल्टंट १९९६ साली जन्मलेल्या एका अविवाहित मुलीची माहिती देत आहे. तो सांगतो की, या मुलीची उंची ५ फूट ३ इंच असून ती सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि तिचा महिन्याचा पगार तब्बल ९० हजार रुपये आहे. पुढे तो असंही सांगतो की, या मुलीच्या घरच्यांना असा मुलगा हवाय जो वर्षाला १२ ते १५ लाख रुपये कमवत असेल.

पाहा व्हायरल व्हिडिओ

View post on Instagram
 

हा अनाउन्समेंटचा प्रकार सुरू असतानाच, तिथे उपस्थित असलेल्या मुलाकडच्या मंडळींनी त्याला गराडा घातला. या माणसाच्या हातात असलेल्या कागदावर मुलीचा फोटो आणि माहिती होती, ज्याचे लोक फोटो काढताना दिसले. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये हा कन्सल्टंट त्या मुलीचा उल्लेख चक्क "बढिया व्हरायटी" (उत्तम प्रकार) असा करताना ऐकू येत आहे.

इंटरनेटवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?

लग्नासाठी जोडीदार शोधण्याच्या या लिलावासारख्या प्रकाराची इंटरनेटवर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. 'परफेक्ट' जोडीदार शोधण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहिलंय, "असं वाटतंय जणू फरिदाबादमध्ये कारचा लिलाव सुरू आहे."

दुसऱ्या एकाने कमेंट केली, "या जन्मासाठी मी आता पुरेसं पाहिलंय."

आणखी एकाने लिहिलं, "पण हे माझ्या फीडमध्ये का आलंय... काल रात्री मी जुन्या वस्तूंच्या लिलावाबद्दल सर्च करत होतो, पण तरीही... हे काय चाललंय???"

तर दुसरीकडे, काही लोकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत लिहिलंय, "अरे, थोडी तरी लाज बाळगा यार तुम्ही लोक."