म्हैसूरहून चेन्नईला निघालेल्या ९ इंजिनिअर्सची कार गुगल मॅपचा शॉर्टकट शोधताना चामराजनगरच्या घनदाट जंगलात खड्ड्यात कोसळली. जंगली हत्तींच्या भीतीने त्यांनी रात्रभर कारमध्येच जीव मुठीत धरून काढली. सकाळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

चामराजनगर: अनोळखी रस्त्यांवर गुगल मॅप (Google Maps) दाखवतो त्या शॉर्टकटवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, तर जीवावर कसं बेतू शकतं, याची आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. म्हैसूर दसऱ्याची रोषणाई पाहून चेन्नईला निघालेले बंगळुरूचे ९ सॉफ्टवेअर इंजिनिअर्स मॅपच्या नादात घनदाट जंगलात घुसले आणि त्यांची कार थेट एका खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.

हे इंजिनिअर्स म्हैसूरहून तमिळनाडूला चालले होते. तेव्हा गुगल मॅपने त्यांना एक शॉर्टकट रस्ता दाखवला. यावर विश्वास ठेवून ते पुढे गेले आणि त्यांची कार तमिळनाडू सीमेवरील चामराजनगर जिल्ह्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत असलेल्या आसनूरच्या घनदाट जंगलात शिरली. रस्ता खूपच अरुंद आणि दगड-काट्यांचा होता. तिथे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल खड्ड्यात पडली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.

जंगली हत्तींच्या भीतीत गेली रात्र:

कार खड्ड्यात पडताच जंगलात मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झालं. सत्यमंगलमचं जंगल हे जंगली हत्ती आणि बिबट्यांचा भाग आहे. त्यामुळे बाहेर पडलो तर जीव नक्की जाईल, हे या तरुणांना समजलं होतं. त्यांनी कारचे लाईट्स बंद केले आणि रात्रभर आतच जीव मुठीत धरून बसून राहिले.

पहाटे ५ च्या सुमारास एका तरुणाने थोडं चालत जाऊन नेटवर्क शोधलं. सिग्नल मिळताच त्याने लगेच ११२ या हेल्पलाईनवर कॉल केला. माहिती मिळताच चामराजनगर अग्निशमन दल, वनविभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली आणि सर्व ९ जणांना सुखरूप वाचवण्यात आलं.

याआधी केरळ आणि महाराष्ट्रातही गुगल मॅपवर विश्वास ठेवून गाड्या नदीत कोसळल्याच्या आणि त्यात लोकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनोळखी जंगलात किंवा ग्रामीण भागात गुगल मॅप वापरताना स्थानिकांना रस्ता विचारणं खूप गरजेचं आहे, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.