Bengaluru Techie Finds Happiness as Uber Driver : ओरॅकल कंपनीतून काढून टाकल्यानंतर बंगळूरमधील एका टेकीने नवीन आयुष्य सुरू केलं आहे. १४ वर्षांचा अनुभव असलेला हा इंजिनिअर आता कॅब ड्रायव्हर बनला आहे.
Bengaluru Techie Finds Happiness as Uber Driver : आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ओरॅकलने आतापर्यंत ३० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. अनेक इंजिनिअर्सना तर पहाटेच ईमेल पाठवून 'उद्यापासून कामावर येऊ नका' असं सांगण्यात आलं. यामुळे अनेकांपुढे आता पुढे काय करायचं? असा प्रश्न उभा राहिला आहे. खरंतर, ही फक्त ओरॅकल कंपनीची गोष्ट नाही. AI टेक्नॉलॉजी आल्यापासून लाखो सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत आणि अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. कधीही काहीही होऊ शकतं, अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे आता इंजिनिअरिंगची पदवी घेणारे विद्यार्थीही चिंतेत आहेत. काही हजारांच्या पगारावर काम करण्याची वेळ येईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्याची व्हायरल पोस्ट
या सगळ्या वातावरणात, ओरॅकलमधून नोकरी गमावलेल्या एका कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट खूप चर्चेत आहे. ही पोस्ट वाचून अनेकजण 'आपणही नोकरी सोडली तर बरं होईल' असा विचार करत आहेत. याचं कारण म्हणजे, १४ वर्षांच्या सेवेनंतर नोकरी गमावलेल्या या टेकीने शेअर केलेला अनुभव. ओरॅकलमधील नोकरी गेल्यानंतर बंगळूरमधील हा टेकी आता कॅब ड्रायव्हर बनला आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर लिहिलंय की, 'आता आयुष्य खूप सुंदर झालं आहे. कोणतीही भीती नाही, कोणताही ताण नाही आणि सोशल मीडियावर रडत बसण्याचीही गरज नाही.'
मित्राने सांगितली पूर्ण कहाणी
मूळचा भुवनेश्वरचा असलेल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअरबद्दल त्याचा मित्र सत्या नायक (Satya Nayak) याने आपल्या 'X' अकाउंटवर सविस्तर लिहिलं आहे. सत्याने सांगितलं की, त्याच्या मित्राने आधीच दोन जॉइंट खात्यांमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपयांची पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD) केली आहे. एक खातं त्याच्या आई-वडिलांच्या नावे आणि दुसरं स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे आहे. यातून त्याला दर महिन्याला जवळपास २८ हजार रुपये व्याज मिळतं. याशिवाय, त्याने काही भारतीय बँकांमध्ये सुमारे ३० लाख रुपयांच्या एफडी केल्या आहेत, ज्यातून त्याला १५ हजार रुपये मिळतात.
आता बनलाय कॅब ड्रायव्हर
तो आता त्याच्या आई-वडिलांसोबत स्वतःच्या घरात राहतो. त्याला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे त्याने लगेचच उबर ड्रायव्हर (Uber Driver) म्हणून काम सुरू केलं. तो त्याच्या सोयीनुसार काम करतो आणि यातून महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत कमाई करतो. नोकरी करत असताना पैसे वाचवल्यामुळे त्याचं आयुष्य आता 'कूल' झालं आहे, असं तो म्हणतो. नोकरी सोडल्यावर आयुष्य किती सुंदर असू शकतं, हे त्याला आता जाणवत असल्याचं सत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उधळपट्टीला लगाम
त्याच्यावर कोणत्याही मोठ्या शहरातील फ्लॅटचे EMI किंवा इतर कोणतीही कर्जं नाहीत. तो आता शांतपणे आपल्या पालकांच्या मदतीने एक छोटा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. त्याने आपल्या कमाईची कधीही उधळपट्टी केली नाही, म्हणूनच हे सर्व शक्य झालं, असंही सत्याने सांगितलं. ही गोष्ट ऐकून अनेकजण म्हणत आहेत की, नोकरी करत असताना पैसे वाचवण्याचे किती फायदे आहेत. तर काही जण 'मी पण भरपूर पैसे जमा केले आहेत, आता नोकरी सोडण्याचा विचार करतोय' अशा कमेंट्स करत आहेत.


